गुरुदेवांवर अपार श्रद्धा ठेवून विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी शांतपणे आणि अलिप्त मनाने सहन करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. देवांग गडोया !
गुरुदेवांवर अपार श्रद्धा ठेवून विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी शांतपणे आणि अलिप्त मनाने सहन करत गुरुकृपेने प्रारब्धातील अपमृत्यूवर मात करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. देवांग गडोया !
भाग २
भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/446697.html
४. मोठ्या रुग्णालयात भरती केल्यावर आलेल्या अनुभूती
४ अ. मोठ्या रुग्णालयात भरती केल्यावरही प्रकृतीत सुधारणा न होणे, रक्तामधील ‘प्लेटलेट्स’ची (रक्तबिंबिकांची) संख्या वाढत नसल्यामुळे ‘बाहेरून ‘प्लेटलेट्स’ द्याव्या लागतील’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे : मला मोठ्या रुग्णालयात भरती केल्यावर तेथील औषधोपचारानेही माझ्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. माझ्या रक्तामधील ‘प्लेटलेट्स’ची (रक्तबिंबिकांची) संख्या वाढत नसल्यामुळे तेथील आधुनिक वैद्यांनी मला ‘बाहेरून ‘प्लेटलेट्स’ द्याव्या लागतील’, असे सांगितले.
४ आ. अनेक साधक रक्तदान करण्यासाठी रुग्णालयात आल्याचे कळल्यावर त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांनीच काळजी घेतल्याचे वाटून त्यांच्या प्रीतीने भारावून जाणे : आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांना याविषयी कळवल्यावर त्यांनी आश्रमातील अनेक साधकांना रक्तदान करण्यासाठी रुग्णालयात पाठवले. हे समजल्यावर माझे मन कृतज्ञतेने भरून आले. आम्ही गोव्यात नवीन असल्यामुळे मला रक्त देण्यासाठी माझे इतर कुटुंबीय येथे नव्हते; मात्र रक्त देण्यासाठी एवढ्या साधकांना पाठवून परात्पर गुरु डॉक्टरांंनीच माझी काळजी घेतली. गुरुदेवांच्या या प्रीतीने मी भारावून गेलो.
‘काहीतरी मोठे घडत आहे’, याची जाणीव मात्र माझ्या मनाला होत नव्हती. ते सतत स्थिर होते. बर्याच दिवसांनंतर मी सर्वकाही साक्षीभावाने पहात होतो. माझ्या शरिराला जे भोगावे लागत आहे, त्याचा परिणाम माझ्या मनावर होत नव्हता.
४ इ. रात्री अचानक खोलीतील वस्तू ओळखता न येणे, त्या वेळी स्वतःचा अंत जवळ आला असल्याचे वाटून ‘सर्वांना शेवटचा नमस्कार’, असे म्हणून डोळे मिटणे आणि अकस्मात् शरिराला हिसका बसून जागे होणे अन् पुन्हा सर्व ओळखता येणे, त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी नवजीवन दिल्याचे जाणवणे : ‘डेंग्यू’चा ताप आणि त्यासाठी घ्यावी लागणारी पुष्कळ औषधे यांमुळे मी कित्येक दिवस जेवू शकलो नव्हतो. मी केवळ थोडा चहा आणि ताक घेत होतो. मला सतत ताप असायचा, तसेच माझी डोकेदुखी आणि अंगदुखी न्यून होत नव्हती. त्यामुळे मला रात्री झोप येत नव्हती. एके दिवशी पहाटे ३ वाजता मी पलंगावर पडून खोलीतील वस्तूंकडे पहात होतो. खोलीतील पडदे, पलंग आणि इतर वस्तू मला ओळखता येत होत्या; पण नंतरच्या ३० सेकंदांत मला काहीच ओळखता येईनासे झाले. तेव्हा ‘माझा अंत जवळ आला असून हे माझे शेवटचे क्षण आहेत’, असे मला जाणवू लागले. त्या क्षणी ‘सर्वांना माझा शेवटचा नमस्कार’, इतकेच शब्द माझ्या तोंडून बाहेर पडले आणि माझे डोळे मिटले. त्यानंतर अकस्मात् माझ्या शरिराला हिसका बसला आणि मी जागा झालो. त्या वेळी मला पुन्हा खोलीतील वस्तू ओळखता येऊ लागल्या. असे सलग ३ रात्री घडले. तेव्हा ‘हे नेमके काय आहे ?’, ते मला समजले नसल्यामुळे ‘तेे एक स्वप्न असावे’, असे मला वाटले. असे असले, तरी माझा अंत जवळ आल्याचे मात्र मी स्पष्टपणे अनुभवले होते. त्याच कालावधीत सौ. रिशिताची परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली. त्या वेळी तिने त्यांना ‘देवांग यातून वाचू शकतील का ?’, असे विचारले. तेव्हा त्यांनी ‘सर्वकाही ठीक होईल’, असे म्हणून आम्हाला आश्वस्त केले. तेव्हा मला एवढेच समजले होते, ‘माझा मृत्यू जवळ आलेलाच होता; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांनी मला नवीन जीवन दिले.’
५. रुग्णालयातून रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती
५ अ. ‘डेंग्यू’पासून मुक्त झाल्यावर कावीळ होणे, त्यामुळे रुग्णालयातून घरी जाण्याचा विचार करून आश्रमात परत येणे आणि आश्रमात आल्यानंतर ‘मी खर्या अर्थाने जिवंत आहे’, असे वाटणे : मोठ्या रुग्णालयात ८ दिवस राहिल्यावर मी ‘डेंग्यू’पासून मुक्त झालो; पण मला कावीळ झाली. मी तेथील आधुनिक वैद्यांना मला घरी जाऊ देण्याविषयी विनंती केली. त्यांनी माझ्याकडून एका संमतीपत्रावर स्वाक्षरी घेऊन मला घरी जाण्याची सशर्त अनुमती दिली. मी सनातनच्या रामनाथी आश्रमात आलो. मला पाहून आश्रमातील सर्व साधकांना आनंद झाला. मी चार दिवस आश्रमात राहिलो अन् त्या काळात ‘मी खर्या अर्थाने जिवंत आहे’, असे मला वाटले.
५ आ. अंगात काही घंट्यांपर्यंत नियमितपणे आणि पुष्कळ ताप येत असल्याने पत्नीने शरीर थंड पाण्याने पुसून काढणे, त्या वेळी तिला आगीच्या भट्टीत हात घातल्याप्रमाणे ते गरम वाटणे : मला भूक लागत नसली, तरी मी आश्रमात आल्यापासून अल्प प्रमाणात जेवू शकत होतो. तेवढे जेवणही माझे शरीर आणि मन यांच्या पोषणासाठी पुरेसे होते. मला नियमितपणे दुपार ते संध्याकाळपर्यंत आणि पुन्हा रात्री ९ ते मध्यरात्रीपर्यंत ताप येत होता. हा ताप २ ते २.५ डिग्री इतका अधिक असायचा. त्यामुळे सौ. रिशिता माझे शरीर थंड पाण्याच्या कपड्याने पुसून काढत असे. माझ्या शरिराला हात लावताच तिला ‘आगीच्या भट्टीत हात घातले आहेत’, असे वाटत असे. इतके ते गरम लागत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या कालावधीत माझे मन मात्र शांत होते. तेव्हा ‘माझ्या शरिराला काही होत असले, तरी माझे मन मात्र त्यापासून अलिप्त आहे’, असे मला जाणवत होते.’
५ इ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ३० मिनिटे मंत्रजप केल्यावर अंगातील ताप १.५ डिग्रीने उणावणे, त्या वेळी साधकाच्या शरिरावर सोनेरी रंगाचे चैतन्य पसरून ते १ घंटा टिकून राहिल्याचे पत्नीला दिसणे; परंतु आध्यात्मिक त्रासाचा जोर वाढल्यामुळे पुन्हा ताप आल्याचे जाणवणे : एके दिवशी माझा ताप न्यून होत नव्हता. त्या वेळी अकस्मात् माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी परात्पर गुरु पांडे महाराज यांचा भ्रमणभाष आला. ताप उतरत नसल्याचे कळल्यावर त्यांनी स्वतः मंत्रजप करायला आरंभ केला. ३० मिनिटे मंत्रजप केल्यानंतर माझा ताप १.५ डिग्रीने उतरला होता. त्यानंतर मला बरे वाटू लागले; मात्र मंत्रजप संपल्यावर १ घंट्यानंतर माझा ताप पुन्हा वाढला. परात्पर गुरु पांडे महाराजांचा मंत्रजप चालू असतांना सौ. रिशिता माझ्या जवळ बसली होती. त्या वेळी तिला ‘माझ्या शरिरावर सोनेरी रंगाचे चैतन्य पसरले आहे’, असे दिसले. तेे चैतन्य मंत्रजपानंतर १ घंटा टिकून होते; पण नंतर ते उणावले. त्यामुळे ‘माझ्या आध्यात्मिक त्रासाचा जोर वाढल्यामुळे मला पुन्हा ताप आला’, असे आम्हाला स्पष्टपणे जाणवले.
५ ई. शरिराच्या मानाने पोट मोठे दिसणे आणि तपासणीनंतर यकृताचा आजार झाल्याचे निदान होणे : माझे वजन न्यून झाले असले, तरी पोट मात्र मोठे दिसत होते. हे सौ. रिशिताच्या लक्षात आले. हे अनैसर्गिक असल्याने ‘सोनोग्राफी’ करण्यात आली. तेव्हा माझे यकृत २ इंचांनी वाढल्याचे आढळले. नंतर मी मडगाव (गोवा) येथील एका तज्ञाकडे गेलो. त्यांनी माझी संपूर्ण तपासणी केल्यानंतर ‘तुम्हाला ‘लिव्हर सिर्होसिस’ झाले असल्यामुळे तुमचे यकृत केवळ ५० टक्केच कार्यरत आहे. अनियंत्रित मद्यपान करणार्या व्यक्तीला हा त्रास होतो’, असे सांगितले. मी त्यांना ‘आयुष्यात मी कधीही मद्यपान केलेले नाही’, असे सांगितले. तेव्हा त्यांचा माझ्यावर विश्वासच बसला नाही. ‘आपण औषधोपचार चालू करू; मात्र ‘एकही ‘डोस’ चुकू नये’, याकडे लक्ष द्यावे लागेल’, असे त्यांनी सांगितले. माझी अवस्था पाहून ‘मुंबईत माझ्यावर वैद्यकीय उपचार व्हावेत’, असे माझ्या कुटुंबियांना वाटत होते. त्यामुळे या तज्ञांनी दिलेला सविस्तर अहवाल मी माझ्या भावाला पाठवला.
(क्रमश:)
– श्री. देवांग गडोया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०१८)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |