हिंगोली जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ४० गावांमध्ये भूकंपाचे धक्के !
३.२ रिश्टर स्केलची नोंद
हिंगोली – जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या तालुक्यांमध्ये ३० जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी ४० गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची ३.२ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे. वसमत आणि औंढा तालुक्यांत मागील काही दिवसांपासून भूगर्भातून मोठा आवाज होणे, तसेच भूकंपाचे धक्के जाणवण्याच्या घटना नित्याचेच झाले आहे. मागील ३-४ वर्षांपासून या तालुक्यांत अनेक गावांतून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या ठिकाणी कुठेही मोठी हानी झाली नाही, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सूत्रांनी सांगितले. या भागाची तातडीने पाहणी करून त्याविषयीचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली आहे.