केंद्र सरकारची रस्ते अपघातातील घायाळांच्या उपचारांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत ‘कॅशलेस’ योजना
नवी देहली – केंद्र सरकार देशातील रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतचे ‘कॅशलेस’ साहाय्य देणारी योजना वर्ष २०२१-२०२२ या नवीन आर्थिक वर्षापासून लागू करण्याची शक्यता आहे. यात अपघातात घायाळ झालेल्या व्यक्तीला लगेच भरती करून उपचार करणे रुग्णालयांसाठी सक्तीचे असेल. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने ही योजना बनवली आहे. देशात प्रतिवर्षी ५ लाख अपघातांत दीड लाख लोकांचा मृत्यू होतो आणि सुमारे साडेतीन लाख लोक अपंग होतात.
या योजनेच्या अंतर्गत मोटार वाहन अपघात निधी उभारला जाणार आहे. त्यातून अपघातात घायाळ झालेल्यांच्या उपचारांसाठी, तसेच अपघातात मृत व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई देण्यात येईल. भरपाईची आणि साहाय्याची रक्कम केंद्र सरकार ठरवेल.
कॅशलेस उपचारातील प्रमुख सूत्रे
१. अपघातात घायाळ झालेल्या व्यक्तीला त्वरित भरती करून उपचार करणे रुग्णालयांसाठी बंधनकारक असेल.
२. घायाळ व्यक्ती पूर्णपणे बरी होईपर्यंत कॅशलेस उपचार चालू रहातील.
३. घायाळाला रुग्णालयात आणणे किंवा दुसर्या रुग्णालयात घेऊन जाण्याच्या खर्चाचाही यात समावेश असेल.
४. प्रत्येक घायाळ व्यक्तीसाठी दीड लाख रुपयांपर्यंत उपचार.