(म्हणे) ‘एल्गार’ ही अवैध नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही !’- अरुंधती रॉय
ज्या परिषदेच्या आयोजित ठिकाणी कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या १९ संशयित आरोपींचे ‘पोस्टर’ लावण्यात येते, ती परिषद अवैध नाही, असे म्हणता येईल का ?
पुणे – कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी अटकेत असलेल्यांची मी चांगली सहकारी आहे. त्यांनी कोणती चूक केली आहे, असे मला वाटत नाही. त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही, तरी सहस्रो पानांचे आरोपपत्र नोंद केले गेले. कायद्यावर आधारित न्यायव्यवस्था आणणे, हे भारतात पुष्कळ मोठे अवघड काम आहे. आम्ही दंगली भडकावण्याचे काम करत नाही. इतरांसारखे आम्ही एकमेकांना आपापसांत लढायला लावत नाही, असे वक्तव्य अरुंधती रॉय यांनी केलेे. पुण्यात ३० जानेवारी या दिवशी आयोजित एल्गार परिषदेत त्या बोलत होत्या. (वर्ष २०१७ मधील एल्गार परिषदेनंतर दुसर्या दिवशी कोरेगाव भीमा येथील स्तंभाजवळ जी हिंसाचाराची घटना घडली, त्याला एल्गार परिषदेची किनार असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते. तसेच यात माओवाद्यांचा सहभाग असल्याचेही आरोप करण्यात आले होते. – संपादक) या वेळी परिषदेचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, निवृत्त पोलीस अधिकारी एस्.एन्. मुश्रीफ, माजी आय.ए.एस्. अधिकारी कन्नन गोपीनाथन् आदी उपस्थित होते.
अमेरिकेच्या कॅपिटॉल हिलवर आक्रमण करणार्या प्रवृत्ती आपल्या देशात सत्तेत आहेत. त्या संसद आणि लोकशाही संस्था नष्ट करत चालल्या असून, गोमूत्र हे त्यांचे आवडते औषध आहे, अशा शब्दांत त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. (गोमूत्रावर टीका करणार्यांनी त्याचे लाभ अनुभवले आहेत का ?- संपादक) ब्राह्मण्यवाद, भांडवलशाही, पितृसत्ताक व्यवस्था आणि इस्लामप्रती असलेल्या द्वेषभावनेच्या विरोधात एल्गार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात ‘सत्यशोधक रेझिस्टन्स’ (एस्.एस्.आर्.), म्हणजेच द्वेषाच्या विरोधात प्रेमाची लढाई उभारावी लागेल, असेही त्या म्हणाल्या. (हिंदुद्वेषातून हिंदुत्वनिष्ठांवर सतत टीका करून त्यांना झोडपणारे म्हणे प्रेमाची लढाई करणार ! – संपादक)
देहलीतील हिंसेमागे भाजप, संघ यांचा हात असल्याचा आरोप बी.जी. कोळसे पाटील यांनी केला. मनुवादी आणि मनीवादी एकत्र येऊन जात, पंथ, धर्माच्या नावाने आपले शोषण करत आहेत. त्यांचा सामना करत नवी व्यवस्था आणण्याचा संदेश देण्यासाठी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कोळसे पाटील यांनी सांगितले.