यवतमाळ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त गोळा झालेले राष्ट्रध्वज शासनाला सुपुर्द !
‘राष्ट्र्रध्वजाचा मान राखा’ मोहिमेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद !
यवतमाळ, ३१ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात राबवलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मोहिमेमध्ये समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाची विटंबना होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी यांना, तसेच शाळेत एकूण २९ निवेदने देण्यात आली. जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी निवेदनाची तात्काळ नोंद घेत वृत्तपत्राच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखावा, यासाठी नागरिकांना आव्हान केले.
समितीच्या वतीने सामाजिक माध्यमांद्वारे व्यापक प्रमाणात जनजागृती करून नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले, तसेच ध्वजविक्रेते यांचेही प्रबोधन करण्यात आले. २६ जानेवारी या दिवशी शहरातील विविध भागांमध्ये ‘राष्ट्रध्वज सन्मान पेटी’ फिरवण्यात आली. त्यात खराब झालेले, खाली पडलेले आणि नागरिकांनी दिलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यात आले. ते २८ जानेवारी या दिवशी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वर्हाडे यांना सुपुर्द करण्यात आले. ही मोहीम शहरासह वणी, पुसद, नेर, दारव्हा, कारंजा शहरांमध्ये राबवण्यात आली.
ईशनिंदाविरोधी कायदा बनवण्यासाठी यवतमाळ येथून केंद्र शासनाला निवेदन !ईशनिंदाविरोधी कायदा करून श्रद्धास्थानांचा होणारा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्याद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांना २८ जानेवारी या दिवशी निवेदन पाठवण्यात आले. निवेदन देतांना समितीचे दत्तात्रय फोकमारे, प्रशांत सोळंके आणि धर्मप्रेमी मंगेश साखरकर उपस्थित होते. |