वाहनात इंधन नसल्याने जिल्हा रुग्णालयात पाठवायचे ‘स्वॅब’ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पडून असल्याचे उघड !
जनतेच्या जिवाशी बेतणारा प्रशासनाचा भोंगळ कारभार !वरिष्ठ पातळीवरून निधी मिळत नसल्याचे वैद्यकीय अधिकार्यांकडून स्पष्ट |
कणकवली- येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या तपासणीसाठी घेतलेले रुग्णांच्या घशातील स्राव (स्वॅब) वाहनात इंधन नसल्याने जिल्हा रुग्णालयात पाठवले गेले नसल्याचे उघड झाले. याची माहिती मिळताच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात धडक देत परिस्थितीची माहिती घेतली. या वेळी त्यांनी स्वखर्चातून इंधनासह खासगी वाहनही उपलब्ध करून दिले. (कोरोना महामारीची भीषणता लक्षात येऊनही त्याच्या परिणामांकडे दुर्लक्ष करणार्या प्रशासनाला काय म्हणावे ? प्रत्येक गोष्टीत लोकप्रतिनिधींना लक्ष घालावे लागत असेल, जनतेला आंदोलन करावे लागत असेेल, तर प्रशासनाचा पांढरा हत्ती जनतेच्या पैशातून का पोसायचा ? – संपादक)
आमदार राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिकलगार आणि डॉ. सतीश टाक यांच्याकडून माहिती घेतली. त्या वेळी पत्रव्यवहार करूनही आरोग्य उपसंचालकांनी निधी उपलब्ध करून दिला नाही. रुग्णवाहिकेमध्येही इंधन भरण्यासाठी निधी नाही. आम्ही स्वत:च इंधन भरून रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन’ आणले; मात्र वरिष्ठ पातळीवरून निधी दिला जात नसल्याचे स्पष्ट केले.
ही स्थिती समजल्यावर संतप्त आमदार नितेश राणे यांनी सरकारच्या कारभारावर टीका करतांना म्हटले की, सरकार जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. सरकारला लाज वाटली पाहिजे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकार्यांसह तातडीची बैठक घेणार आहे.
सिंधुदुर्गातील कोरोनाची सद्य:स्थिती
१. गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण १२
२. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ६ सहस्र २३९
३. बरे झालेले एकूण रुग्ण ५ सहस्र ८५०
४. उपचार चालू असलेले एकूण रुग्ण २१७
५. मृत्यू झालेले एकूण रुग्ण १६६