६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. घनश्याम गावडे यांना लागवडीविषयी आलेल्या अनुभूती
१. ‘झाडांना बोललेले समजते’, याची आलेली प्रचीती
१ अ. पावट्याच्या झाडांना शेंगा येईनाशा झाल्यावर शेतकी तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधाची फवारणी करणे आणि शेणखत घालून २ मास झाल्यानंतरही शेंगा न येणे : ‘आम्ही अनुमाने सहस्र चौरस मीटरमध्ये फेब्रुवारी मासात पावटा लावला होता. त्याला २ मासाने शेंगा येऊ लागल्या. आम्ही ५ – ६ किलो शेंगा काढल्या. नंतर शेंगा येईनाशा झाल्या. आम्ही शेतकी खात्यातील अधिकार्यांना शेंगा न येण्याचे कारण विचारले. ते म्हणाले, ‘‘प्रति ४ ते ८ दिवसांनी औषधाची फवारणी करत राहिले पाहिजे आणि शेणखत घालायला पाहिजे.’’ त्याप्रमाणे आम्ही औषध आणि खत घातले. झाडांना फुले येत होती; पण शेंग येत नव्हती. आम्ही २ मास शेंग येण्याची वाट पाहिली.
१ आ. पावट्याच्या झाडांना ‘तुम्हाला १५ दिवसांची संधी देतो, १५ दिवसांत शेंग लागली नाही, तर एकही झाड ठेवणार नाही’, असे सांगणे आणि त्यानंतर १० ते १२ दिवसांनंतर सर्व झाडांना लहान शेंगा लागणे : १५.६.२०२० या दिवशी मी पावट्याच्या झाडांना सांगितले, ‘तुम्हाला १५ दिवसांची संधी देतो. १५ दिवसांत जर शेंग लागली नाही, तर एकही झाड ठेवणार नाही. सर्व काढून टाकीन.’ नंतर मी १० ते १२ दिवस त्या झाडांकडे लक्षही दिले नाही. तेव्हा माझ्या समवेत सेवा करणार्या सहसाधकाने मला सांगितले, ‘‘पावट्यांना शेंगा यायला लागल्या.’’ तेव्हा मी पहायला गेलो, तर सर्व झाडांना लहान शेंगा आल्या होत्या. हे पाहून माझ्या लक्षात आले, ‘आपण जे बोलतो, ते झाडांनाही कळते.’ नंतर काही दिवसांनी आम्ही प्रथमच १२ ते १५ किलो शेंगा काढल्या.
२. पाऊस थांबल्यामुळे झाडे वाळू लागणे, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप अन् प्रार्थना केल्यावर त्या दिवसापासून पाऊस पडायला आरंभ होणे
२५ ते २७.६.२०२० या ३ दिवसांत आम्ही १२० झाडांची रोपे लावली. २६.६.२०२० या दिवसापासून पाऊस पडणे बंद झाल्याने झाडे वाळू लागली. मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना संपर्क करून पाऊस पडण्यासाठी नामजपादी उपाय विचारले. तेव्हा सद्गुरु गाडगीळकाकांनी तोंडासमोर तळहात धरून ‘ॐ’ हा नामजप दिवसातून २ घंटे करायला सांगितला, तसेच ‘लावलेली झाडे जिवंत राहू दे’, अशी प्रार्थना करायला सांगितली. मी ज्या दिवसापासून नामजप करायला आरंभ केला, त्या दिवसापासून पाऊस पडू लागला. या प्रसंगातून सद्गुरु गाडगीळकाकांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता लक्षात येते.
३. आपत्काळाच्या दृष्टीने देवाने वेगवेगळ्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फळझाडे लावण्याचा विचार देणे आणि त्याने तशी बियाणे परिचितांकडून मागवणे अन् पाऊस पडायच्या वेळी ती बियाणे साधकाला उपलब्ध होणे
‘आपत्काळाच्या दृष्टीने आपल्याकडे असलेल्या जागेत वेगवेगळ्या फळभाज्या आणि फळझाडे लावली पाहिजेत’, असे मला वाटले. त्याप्रमाणे मी ठिकठिकाणचे साधक आणि माझ्या ओळखीच्या व्यक्ती यांना ‘निरफणस, पेरू, पपनस, अननस, पपई, आंबा, केळी आणि काही पालेभाज्या अन् फळभाज्या यांच्या बिया कुणाकडे मिळत असेल, तर मला कळवा’, असे सांगितले.
जून मासात पाऊस पडायला आरंभ झाला आणि मी मागितलेली फळझाडे, पालेभाज्या अन् फळभाज्या यांच्या बिया साधक आणि समाजातील व्यक्ती यांच्याकडून मिळाल्या. तेव्हा वाटले, ‘देवानेच मला हे विचार दिले होते आणि देवानेच ते पूर्ण केले.’ त्याविषयी मी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. घनश्याम गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२०)