एका पंचतारांकित उपाहारगृहातील स्वयंपाकघरात काम करतांना आणि रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात सेवा करत असतांना श्री. अपूर्व ढगे यांना जाणवलेला भेद

आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

श्री. अपूर्व ढगे

१. बोलण्याचे स्वरूप

१ अ. उपाहारगृह : ‘उपाहारगृहामध्ये
काम करतांना किंवा एकमेकांशी बोलतांना ते पुष्कळ शिव्या देतात. त्यामुळे तिथे जेवण बनवत असतांना मला कधीच चांगले वाटायचे नाही आणि आनंदही मिळायचा नाही. तिथे सतत लोक आरडा-ओरडा करायचे. त्यामुळे शांतता नसायची आणि वातावरणात पुष्कळ रज-तम जाणवायचे.
१ आ. आश्रम : आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात सेवा करतांना मला पुष्कळ चांगले आणि प्रसन्न वाटते; कारण साधक शांततेत अन् नामजप करत स्वयंपाक बनवतात. साधक ‘गुरूंचा प्रसाद बनवत आहोत’, असा भाव ठेवतात. त्यामुळे येथील वातावरणातही चैतन्य जाणवते.

२. आवाज

२ अ. उपाहारगृह : उपाहारगृहातील स्वयंपाकघरात बोलण्याचा आणि भांड्याचा पुष्कळ आवाज असतो. त्यामुळे काम करतांना माझे मन स्थिर नसायचे. पुष्कळ अस्वस्थ वाटून कधी कधी डोकेसुद्धा दुखायचे.

२ आ. आश्रम : सेवा करतांना माझे मन पुष्कळ स्थिर असते. मी ‘भांड्यांच्या आवाजातून मला दैवी नाद ऐकू येत आहे’, असा भाव ठेवतो. त्यामुळे अन्नपूर्णाकक्षात व्यस्ततेच्या वेळी कितीही आवाज असला, तरी वातावरणात प्रसन्नता जाणवते. अन्नपूर्णाकक्षातही बोलण्याचा आणि भांड्यांचा आवाज असतो; पण त्या आवाजाचा मला कधीही त्रास झाला नाही.

३. अहंची जाणीव असणे

३ अ. उपाहारगृह

१. उपाहारगृहातील स्वयंपाकघरात काम करतांना सतत ‘मला सर्व चांगले करता येते. मी पुष्कळ चांगले पदार्थ बनवतो. मी सर्वांत चांगले काम करतो’, असे अहंचे विचार मनात असायचे.

२. उपाहारगृहामध्ये असतांना मी पुष्कळ जलद गतीने भाजी चिरायचो. त्या वेळी मनात ‘मी किती पटपट चिरतो’, असे अहंचे विचार असायचे.

३ आ. आश्रम

१. अन्नपूर्णाकक्षात सेवा करतांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रकिया केली. त्यासह ‘भाव कसा ठेवायचा ? नामजप करत स्वयंपाक कसा करायचा ?’, हेही शिकायला मिळाले. ‘मी देवासाठी स्वयंपाक करत आहे’, असा भाव ठेवायचो. त्यामुळे ‘देवच सर्व काही करतो आहे’, याची जाणीव झाली. मला माझ्यातील अहंची तीव्रता लक्षात आली.

२. आश्रमात आल्यानंतरसुद्धा मी सुरीने भाजी चिरायचो, तेव्हा अहंचे पुष्कळ विचार असून दिखाऊपणाही असायचा. साधक माझे कौतुक करायचे, त्या वेळी माझा अहं आणखीन वाढायचा. मी मनाशी ठरवले होते, ‘मी विळीवर कधीच चिरणार नाही’; पण एक दिवस मी विळीवर चिरायला बसलो. थोड्या वेळाने मला पुष्कळ चांगले वाटू लागले. मन शांत झाले आणि एकाग्रताही साधली गेली.
​त्या वेळी माझी शिकण्याची स्थिती असल्याने ‘सुरीने भाजी चिरतांना माझा अहं जागृत असायचा; कारण मला चांगलेच येते’, असा मनात विचार असायचा; पण विळीवर चिरता येत नसल्यामुळे देवालाच सर्व विचारून करणे होते. त्यामुळे शिकण्याच्या स्थितीत रहाता आले, हे लक्षात आले. त्या दिवसानंतर ‘मला आता विळीवरच चिरायचे आहे’, असा मनाचा निश्‍चय झाला. त्यासाठी देवाचरणी कृतज्ञता !

४. घरची आठवण

४ अ. उपाहारगृह : उपाहारगृहात कामाला आल्यानंतर आवरण आल्यासारखे वाटायचे. मनात सतत ‘कधी एकदा काम पूर्ण होईल आणि मला घरी जाता येईल’, असे वाटायचे. ‘घरी गेल्यावर मला सेवा करायला मिळेल आणि माझा सर्व थकवा निघून जाईल’, असे मला वाटायचे. त्यामुळे मी माझ्या कामाची वेळ संपण्याची वाट पहात असायचो.

४ आ. आश्रम : आश्रमात मी अधिवेशन सेवेसाठी यायचो आणि अन्नपूर्णाकक्षात सेवा करायचो. त्या वेळी मला कधीच त्रास झाला नाही. घरची आठवणसुद्धा यायची नाही. ‘दिवसभर स्वयंपाक करावा’, असे वाटायचे. त्या वेळी ‘परत चाकरी करण्यास जाऊच नये. अन्नपूर्णाकक्षातच सेवा करूया’, असे वाटायचे.

५. सहकर्मचारी आणि साधक यांची मानसिकता

५ अ. उपाहारगृह : उपाहारगृहातील काम करत असतांना मी नामजप करत पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करायचो; पण माझ्या सहकर्मचार्‍यांना मी शांत दिसलो, तर ते माझी विनाकारण मस्करी करायचे. तेव्हा माझी चिडचीड व्हायची आणि माझे लक्ष विचलित व्हायचे.

५ आ. आश्रम : अन्नपूर्णाकक्षात सेवा करतांना साधक एकमेकांना साहाय्य करतात. वेळ वाया जात असल्यास त्याची जाणीव करून देतात. त्या वेळी देवाचरणी पुष्कळ कृतज्ञता वाटते.

६. अन्नाची नासाडी आणि बचत

६ अ. उपाहारगृह : भाजी चिरतांना ती थोडी जरी सडलेली किंवा किडलेली (खराब) असेल, तर आम्ही ती पूर्ण टाकून द्यायचो.

६ आ. आश्रम : आश्रमात भाजी अर्पण येते किंवा विकतही घेतो. गुरुधनाची हानी होऊ नये, यासाठी भाजीचा पुरेपूर वापर केला जातो. भाजी सडलेली किंवा किडलेली असल्यास त्याचा तेवढाच भाग टाकून चांगला भाग घेतला जातो. भाज्यांमधील बियासुद्धा विविध पदार्थांसाठी वापरल्या जातात. ‘अन्नाचा एकही कण वाया जाऊ नये’, याची दक्षता घेतली जाते.

७. प्रार्थनेचे स्वरूप

७ अ. उपाहारगृह : स्वयंपाक बनवतांना कधी प्रार्थना करत नव्हतो. त्यामुळे बर्‍याच वेळा काम करतांना काही सुचायचे नाही आणि पुष्कळ चिडचीडसुद्धा व्हायची. काही वेळा उपाहारगृहामध्ये मी प्रार्थना करून स्वयंपाक केल्यास मला स्थिरता जाणवायची आणि शांत वाटायचे. मी प्रार्थना करायला विसरल्यास मला गोंधळल्यासारखे व्हायचे.

७ आ. आश्रम : अन्नपूर्णाकक्षात प्रार्थना करून स्वयंपाकाला आरंभ करत असल्याने ‘साक्षात् अन्नपूर्णादेवीच स्वयंपाक कसा बनवायचा, हे शिकवत आहे’, याची अनुभूती येते.

८. चूक होणे आणि त्यापुढील प्रक्रिया

८ अ. उपाहारगृह : स्वयंपाक करतांना चूक झाल्यावर आमचे वरिष्ठ ओरडायचे. त्यामुळे त्यांचा राग यायचा आणि मनाची स्थिती पालटून पुष्कळ चिडचीड व्हायची. त्यामुळे स्वयंपाकही शांतपणे बनवता यायचा नाही. पदार्थ बनवतांना ‘वरिष्ठांचा सर्व राग त्या पदार्थावर काढत आहोत’, असे वाटायचे.

८ आ. आश्रम : अन्नपूर्णाकक्षात चूक झाल्यानंतर संतांचे मार्गदर्शन मिळते. ते प्रत्येक वेळी आम्हाला सर्व शांततेने समजावून सांगतात. त्यामुळे ताण येत नाही आणि स्वयंपाक बनवण्याचा आनंद घेता येतो. संतांनी आम्हाला चुकीविषयी मार्गदर्शन केल्यावर देवाच्या चरणी कृतज्ञता वाटते. शिकण्याच्या स्थितीत रहाण्यासाठी दिशा मिळते.

९. पदार्थ करण्याचे स्वरूप आणि त्याचा परिणाम

९ अ. उपाहारगृह : मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ एकाच तेलात तळायचे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूकच केली जाते. मांसाहार शिजवतांना पुष्कळ आवरण यायचे. वातावरणातही उष्णता जाणवायची.

९ आ. आश्रम : आश्रमात शाकाहारीच अन्न ग्रहण केले जाते. ते आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. ‘अन्नपूर्णाकक्षात शाकाहारी अन्न शिजवतो. त्यामुळे देहावरील सर्व आवरण दूर होऊन जात आहे’, असे जाणवते.

परात्पर गुरु डॉक्टरांंनी या लिखाण करण्यास सुचवल्याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. अपूर्व प्र. ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(३.६.२०१९)