मुंबई येथील के.जे. सोमय्या महाविद्यालयात ‘मूल्यप्रवाह’ या उपक्रमाच्या अंतर्गत ‘चरित्रपुष्प’ या प्रमाणपत्रित अभ्यासक्रमाचा ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे शुभारंभ
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ‘नैतिक मूल्या’शी संदर्भातील विषयाचा यू.जी.सी.च्या प्रमाणपत्रित अभ्यासक्रमात समावेश !
मुंबई – शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांना भौतिक, तांत्रिक, वैद्यकीय, कला आदी विविध विषयांचे शिक्षण दिले जाते. यामध्ये कौशल्य प्राप्त करणार्या आणि अधिकाधिक गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांना भविष्यात चांगली नोकरी मिळते. त्यासाठी परिश्रम घेतांना ‘भविष्यकाळ सुसह्य व्हावा’, असा बहुतांश विद्यार्थ्यांचा विचार असतो; मात्र चांगली नोकरी, घर आदी भौतिक वस्तू असूनही कौटुंबिक जीवनात ताणतणाव असेल, तर मनुष्य दु:खी होतो. काळजी करणे, रागीटपणा, संयमाचा अभाव, चिडचिडेपणा, संशयीवृत्ती आदी अनेक दोषांमुळे जीवनात ताणतणावाचे प्रसंग वारंवार निर्माण होतात. त्यामुळे या दोषांवर मात केल्यास खर्या अर्थाने जीवन सुसह्य आणि आनंदी होईल. ही संधी के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स या महाविद्यालयात चालू करण्यात आलेल्या ‘विशेष प्रमाणपत्रित अभ्यासक्रमा’च्या माध्यमातून विद्यार्थी आणि समाजातील जिज्ञासू यांना उपलब्ध झाली आहे. विविध क्षेत्रांत जागतिक पातळीवर शोधप्रबंध सादर करून त्यामध्ये सुवर्णपदकांसह अनेक नामांकने प्राप्त केलेल्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने हा अभ्यासक्रम सिद्ध केला आहे. ‘चरित्रपुष्प’ नावाच्या या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हे अमूल्य ज्ञान आता समाजातील सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगाने (‘यू.जी.सी.’ने) सर्व महाविद्यालयांना ‘मूल्यप्रवाह’ हा उपक्रम राबवणे बंधनकारक केले आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स या महाविद्यालयाने ‘चरित्रपुष्प’ हा अभ्यासक्रम चालू केला आहे. हा अभ्यासक्रम समाजातील सर्व समाजघटकांसाठी आहे. त्यासाठी किमान १२ वीपर्यंत शिक्षण ही अट ठेवण्यात आली आहे. ‘झूम’ या संगणकीय प्रणालीद्वारे ‘ऑनलाईन’ हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी ४६ जणांनी नोंदणी केली असून १२ जानेवारीला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत या अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळ्याद्वारे शुभारंभ करण्यात आला. या वेळी पहिल्या अभ्यासवर्गाचा प्रारंभ श्री सरस्वतीदेवी वंदनेने झाला. या वेळी विद्यार्थी आणि सोमय्या महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्यासह ५२ जण ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.
अभ्यासक्रम पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत ‘१ क्रेडिट’ मूल्य
हा अभ्यासक्रम एकूण ३० घंट्यांचा असणार आहे. यांतील २० घंट्यांमध्ये तात्त्विक भाग शिकवला जाणार आहे, तर उर्वरित १० घंटे प्रायोगिक भाग घेतला जाणार आहे. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत ‘१ क्रेडिट’ मूल्य दिले जाणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात सहभागी होणार्या विद्यार्थ्यांना त्याचा शैक्षणिक लाभही होणार आहे. आठवड्यातून २ दिवस प्रत्येकी २ घंटे हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.
व्यक्तीमत्त्व विकासासाठी अमूल्य मार्गदर्शन
या अभ्यासक्रमामध्ये नैतिक मूल्ये (मॉरल व्हॅल्यूज), सर्वांगीण विकासाची संकल्पना (कन्सेप्ट ऑफ हॉलिस्टीक डेव्हलपमेंट), अध्यात्म (स्पिरिच्युअॅलिटी), ताण-तणावाचे व्यवस्थापन (स्ट्रेस मॅनेजमेंट), आत्मनिरीक्षण कसे करावे ? (सेल्फ इन्ट्रोस्पेक्शन), स्वभावदोष निर्मूलन पद्धत (पर्सनॅलिटी डिफेक्टस् रिम्हूवल प्रोसेस), वेळेचे नियोजन (टाइम मॅनेजमेंट) आदी विषयांवर अमूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यातून व्यक्तीमधील दोषांचे निर्मूलन आणि गुणांची वृद्धी कशी करावी, हे शिकता येणार आहे.
पहिल्या वर्गानंतर सहभागी विद्यार्थ्यांनी ‘ऑनलाईन’ दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया
अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. सत्रात सहभागी झालेले एक प्राध्यापक म्हणाले, ‘‘सहसा महाविद्यालयातील वर्गात १ घंटा बसले, तरी चुळबुळ करणारे विद्यार्थी २ घंट्यांचे हे ऑनलाईन सत्र एकाग्रतेने ऐकत होते.’’
विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया
१. मी आणखी एक घंटाही या सत्रासाठी बसू शकते.
२. हे सत्र आणि हा पूर्ण अभ्यासक्रम आमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे.
३. आम्ही पुढच्या सत्राची आतुरतेने वाट पहात आहोत.
४. अभ्यासात किंवा व्यवहारात काहीही अडले, तर आम्ही ‘गूगल’वर शोधतो; पण आजच्या सत्रातील माहिती ‘गूगल’वर मिळणार नाही.
५. सत्र संपल्यावर नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनीही अभ्यासक्रमाकरता नोंदणी करण्याची इच्छा व्यक्त केली.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रज्ञा प्रभु, मूल्यप्रवाह समितीच्या संचालिका डॉ. वीणा खिलनानी आणि समितीचे अन्य सदस्य आदी सर्वांचे हा अभ्यासक्रम चालू करण्यासाठी सहकार्य लाभले.
– डॉ. (सौ.) सायली यादव, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
समाज आणि राष्ट्र हितासाठी महाविद्यालयांना आवाहन !
नैतिक मूल्यांच्या आधारेच आदर्श समाज घडू शकतो. नैतिक मूल्यांची जोपासना करणार्या व्यक्तीच्या कुटुंबातही ती मूल्ये आपोआप रुजतात. आदर्श कुटुंबांमुळे आदर्श समाज आणि एकप्रकारे आदर्श राष्ट्र घडू शकते. सध्या समाजात असलेली गुन्हेगारी, बलात्कार, हत्या आदींचे मूळ ‘नीतीमत्तेचा अभाव’ हेच आहे. त्यामुळे समाजात नैतिक मूल्यांचे संवर्धन होण्यासाठी महाविद्यालयांनी घेतलेला पुढाकार एकप्रकारे आदर्श समाज आणि राष्ट्र निर्माण होण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल ठरू शकेल. हा अभ्यासक्रम यु.जी.सी. ने मान्यता दिलेला असल्याने अन्य महाविद्यालयांतही निश्चितच आरंभ करता येऊ शकेल.
– डॉ. सायली यादव, प्राध्यापक, के.जे. सोमय्या महाविद्यालय.