माघ वारी होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वारकर्यांनी घेतली भेट
सोलापूर – मागील काही मासांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आषाढी आणि कार्तिकी वारीचा सोहळा झाला नाही. या कालावधीत शासनाने केलेल्या आवाहनानुसार वारकर्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव न्यून झाल्याने पुढील मासात येणारी माघ वारी पार पडावी, यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली. माघ वारीला पुष्कळ मोठी परंपरा आहे, तसेच माघ वारीच्या निमित्ताने अनेक वारकरी मोठ्या निष्ठेने पंढरपूर येथे पायी जातात.
कोरोनाचा प्रादुर्भाव न्यून झाल्याने अनेक सार्वजनिक उपक्रम चालू झाले आहेत. मंदिरेही दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत, तसेच लसीकरणाची मोहीमही चालू करण्यात आली आहे. नियम आणि अटी पाळून वारकर्यांना वारीसाठी संमती मिळावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली. या वेळी ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, लक्ष्मण पाटील, आदर्श इंगळे, गुरुसिद्ध गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.