राष्ट्राकडे पहाण्याचा सर्वपक्षीय शासनकर्त्यांचा अपूर्ण दृष्टीकोन आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा परिपूर्ण दृष्टीकोन !
‘आजचे सर्वपक्षीय शासनकर्ते राष्ट्राकडे केवळ स्थूल दृष्टीने ‘राष्ट्र’ म्हणून पहातात; म्हणून ते राष्ट्राचा भौतिकदृष्ट्या विकास, जनतेसाठी आधुनिक सोयीसुविधा इत्यादींच्या अनुषंगानेच विचार करतात. चराचरातील प्रत्येक गोष्टीच्या अस्तित्वामागे स्थूल कारणासह सूक्ष्म कारणही असते. परात्पर गुरु डॉ. आठवले राष्ट्राकडे स्थूल दृष्टीसह सूक्ष्म दृष्टीने, म्हणजे धर्माच्या दृष्टीनेही पहातात; कारण ‘धर्म’ हा राष्ट्राचा आत्मा आहे. स्थूल दृष्टीने पहाता ‘मनुष्याचे डोळे, कान आदींमुळे मनुष्य कार्य करतो’, असे आपल्याला दिसते; पण खरे पहाता मनुष्याकडून कार्य होण्यासाठी ‘आत्मा’ ही अदृश्य शक्ती कारणीभूत असते. जसे मनुष्याच्या देहातून आत्मा निघून गेला की मनुष्य गतप्राण होतो, तसेच राष्ट्ररूपी शरिरातून धर्मरूपी आत्मा निघून गेला की, राष्ट्रही मृत्यूमुखी पडते. आतापर्यंत विघातक परकीय आणि स्वकीय शक्तींची असंख्य आक्रमणे झेलूनही देवाची कृपा, तीर्थस्थाने, देवळे, संतांचे अस्तित्व आदींमुळे भारत त्यातल्यात्यात टिकून राहिला आहे !
भारत आणखी रसातळाला जाऊ नये, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले सर्वत्र धर्माचा प्रसार होण्यासाठी आणि धर्माधिष्ठित राष्ट्राच्या उभारणीसाठी, म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्नशील आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणतात, ‘राष्ट्राचा विकास आणि समृद्धी यांसाठी प्रयत्न करणे अयोग्य नाही; पण ती धर्माला अनुकूल अशीच हवी.’
यावरून निधर्मी शासनकर्त्यांचा राष्ट्राकडे पहाण्याचा अपूर्ण दृष्टीकोन, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा परिपूर्ण दृष्टीकोन लक्षात येतो. निधर्मी राज्यकर्त्यांकडून धर्माच्या अधिष्ठानावर राष्ट्राची उभारणी होणे कदापि शक्य नाही; म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार हिंदु राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या) स्थापनेसाठी संघटित व्हा अन् मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्या !’
– (पू.) श्री. संदीप आळशी (१३.७.२०१९)