ख्रिस्ती धर्मप्रसारक घरी आले असतांना साधिकेला देवाचे साहाय्य लाभून तिने ख्रिस्ती धर्मप्रसारकांना सडेतोड उत्तर देणे
१. कलियुगात हिंदूंना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणे आणि त्यासाठी क्षात्रतेज अन् ब्राह्मतेज वाढवण्याची आवश्यकता असणे
‘कलियुगातील सद्यःस्थितीत हिंदूंच्या अडचणी वाढल्या असून त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. हिंदु व्यक्ती ‘मी एकटा काय करू शकतो ?’, असा व्यक्तीगत विचार करते. या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज वाढवण्याची आवश्यकता आहे. आपण हे केवळ साधनेनेच साध्य करू शकतो; कारण केवळ ईश्वरच आपल्याला ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज देऊ शकतो.
२. हिंदूंसमोर ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या असणे आणि ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी हिंदूंच्या घरी जाऊन प्रसार करणेे
हिंदूंसमोर ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. आपल्याला अनेक वेळा ख्रिस्ती लोक धर्मप्रसार करतांना दिसतात. ते हिंदूंच्या प्रत्येक घरी जाण्याचे धैर्य दाखवतात. अशाच एका प्रसंगात ‘ईश्वर हिंदु धर्माचे रक्षण कसे करतो ?’, याची अनुभूती मला गुरुकृपेने घेता आली.
२ अ. सकाळी नामजप आणि पूजा करणे : एके दिवशी सकाळी मी २ घंटे नामजप केला आणि स्नान करून पूजा केली. नंतर मी कपाळाला विभूती लावली. त्यानंतर मी सात्त्विक उदबत्तीने वास्तूची शुद्धी करून कालिका स्तोत्र म्हटले, तसेच धूप लावून दुर्गादेवीच्या प्रतिमेला ओवाळले.
२ आ. दारात बायबलची पत्रके वाटणारे ख्रिस्ती धर्मप्रसारक आल्यावर थेट प्रतिक्रिया न देणे : त्याच क्षणी दाराची घंटी वाजली. मला देहाचे भान नव्हते. मी धावत जाऊन पाहिल्यावर दार उघडण्याच्या आधी मला दिसले, ‘एक महिला आणि पुरुष बाहेर उभे आहेत.’ त्या वेळी मला ‘देवच आला आहे’, असे वाटले आणि मी त्याच प्रेमाने दार उघडले. मला महिलेच्या हातात बायबलची काही पत्रके दिसली. ते पाहून मला त्यांना विचारावेसे वाटले, ‘हिंदू त्यांच्या धर्माविषयी सांगण्यासाठी तुमच्या घरी कधी येतात का ? हिंदू त्यांच्या धर्माविषयी तुम्हाला सांगायला आले, तर तुम्हाला काय वाटेल ? तुम्ही त्या वेळी काय कराल ?’; मात्र मी तसे न करता ‘देवाने ज्या भावाने माझ्याकडून दार उघडले, तो भाव कायम ठेवायचा’, असे ठरवले. ‘गुरूंना आपण प्रत्येक प्रसंगात शिकणे अपेक्षित आहे’, याची मला जाणीव झाल्यावर मी त्या स्थितीत राहिले.
२ इ. देहातून उष्ण किरण बाहेर पडणे आणि ‘आज्ञाचक्रावर लावलेल्या कुंकवातून चैतन्याच्या पिवळ्या लहरी बाहेर पडत आहेत’, असे जाणवणे : ‘माझ्या देहातून सूर्यासारखे उष्ण किरण बाहेर पडत आहेत’, असे मला वाटत होते. बाहेर थंडी होती, तरी माझे शरीर धगधगत होते. मी सरळ उभी होते, तरी मला शरिरात कंप जाणवत होता. ‘माझ्या आज्ञाचक्रावरील कुंकवातून चैतन्याच्या पिवळ्या लहरी बाहेर पडत आहेत’, असे मला जाणवत होते. माझ्या देहाची हालचाल होत नव्हती आणि मी पाषाणासारखी उभी होते. ते दोघे मी लावलेल्या कपाळावरील कुंकवाकडे पाहून बोलत होते.
२ ई. ख्रिस्ती प्रसारकांनी शिकवायला आरंभ केल्यावर साधिकेने सडेतोड उत्तर देणे आणि प्रसारकांना भीती वाटणे : त्या महिलेने मला विचारले, ‘‘तुम्हाला जगाची स्थिती पालटायला पाहिजे’, असे वाटते का ?’’ मी मानेने ‘हो’ म्हणाले. त्यावर ती म्हणाली, ‘‘त्यासाठी आपल्याला जगातील लोकांना पालटायला हवे.’’ त्या वेळी माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, ‘आपल्याला इतरांमध्ये पालट हवा असेल, तर आरंभ स्वतःपासून केला पाहिजे. मग ते घर असो किंवा जग ! ‘स्वतःत पालट कसा करायचा? ते सांगा.’ तेव्हा ती महिला बोलायची थांबली आणि पुरुष बोलू लागला. ते म्हणाले, ‘‘देव आपल्यावर किती प्रेम करतो !’, याचे शिक्षण लोकांना देणे आवश्यक आहे.’’ तेव्हा माझ्या मुखातून पुन्हा शब्द बाहेर पडले, ‘देव आपल्यावर प्रेम करतो’, हे अल्प-अधिक प्रमाणात सर्वांना ठाऊक आहे, मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची असू दे. जेव्हा मृत्यूच्या दारातून एखादी व्यक्ती वाचते, तेव्हा ‘देवाने तिला वाचवले’, असे म्हणतात. ‘देवावर प्रेम कसे करायचे ?’, हे जगाला शिकवण्याची आवश्यकता आहे. ‘जन्मदाते आई-वडील मुलांवर प्रेम करतात’, हे प्रत्येक मुलाला ठाऊक असते; परंतु ‘मुलाने आई-वडिलांवर प्रेम करावे’, यासाठी त्याच्यावर चांगले संस्कार करायला हवेत, तरच तो मुलगा आई-वडिलांना देव मानू लागेल. आपण मायेत एवढे गुरफटले आहोत की, आपण देव आणि धर्म यांना विसरलो आहोत.’
मी बोलत असतांना ते दोघे स्तब्ध उभे होते. माझे बोलून झाल्यावर महिलेने तिच्या हातातील पत्रक उघडून मला दाखवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिचा हात थरथर कापत होता. मी ‘साहाय्य करू का ?’, असे विचारल्यावर तिने ते पत्रक न उघडताच माझ्या हातात दिले. तेव्हा माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, ‘‘देवाची सेवा करत आहात, तर उद्देश चांगला ठेवला पाहिजे. देव तुमचे भले करो !’’
त्या क्षणी मला कुणीतरी घरात खेचले आणि दार बंद झाले. घरात गारवा एवढा होता की, माझ्या देहातून येणार्या उष्ण लहरी हळूहळू शांत झाल्या. मी देवासमोर जाऊन शांत बसले. नंतर १० ते १५ मिनिटांनी मला माझ्या देहाची जाणीव होऊ लागली आणि मी घडलेल्या प्रसंगाचा विचार करू लागले.
३. ‘साधना केल्यावर स्वतःच्या माध्यमातून देवाचे तत्त्व कार्यरत होते’, याची प्रचीती येणे
त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘देवच माझ्या माध्यमातून बोलत होता.’ ‘गुरुदेवांनी आपल्याला साधना करण्याचे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व सांगितले आहे’, ते माझ्या लक्षात आले. आपण साधनेत देवावर प्रेम करू लागतो आणि ‘देवच कर्ता करविता आहे’ याची अनुभूती घेतो. आपण इतरांना पालटण्याच्या भूमिकेत स्वतःला विसरतो. ‘आपण स्वतःत कसे पालट करायला हवेत ?’, याचा विचार करून प्रयत्न केले पाहिजेत. गुरुच याविषयी मार्गदर्शन करू शकतात. ‘साधना केल्यावर देवाचे तत्त्व कसे कार्यरत होते !’, हे मला गुरुकृपेने अनुभवता आले आणि माझे मन कृतज्ञतेने भरून आले.’
– सौ. भारती बागवे, कॅनडा (२१.२.२०२०)