राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या जिल्ह्यात एल्गार परिषदेचे आयोजन करणार ! – विनायक मेटे, प्रमुख, शिवसंग्राम पक्ष
खासदार शरद पवार यांच्या विरोधात बारामती येथे एल्गार परिषद
संभाजीनगर – राज्यात नोकर भरती थांबवण्याचे आवाहन मराठा समाजाकडून करण्यात आले होते; मात्र राज्यशासनाच्या अनेक विभागांतून नोकरभरतीचे विज्ञापन काढण्यात आले. नोकर भरती काढणार्या मंत्र्यांच्या विरोधात ७ फेब्रुवारीपासून आंदोलनाला प्रारंभ होणार आहे. प्रत्येक मंत्र्याच्या जिल्ह्यात वेगवेगळी एल्गार परिषद आयोजित करण्यात येणार आहे, अशी घोषणा शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी ३० जानेवारी येथे पत्रकारांशी बोलतांना केली.
ते पुढे म्हणाले की,
१. या एल्गार परिषदेचा प्रारंभ जालना येथून करण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात एल्गार करत परिषदेला प्रारंभ होणार आहे.
२. जालना, नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या विरोधात, नागपूर, मुंबई अशा प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांच्या विरोधात त्या-त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल.
३. राज्याच्या सत्ताकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना वेगळेच महत्त्व आहे. त्यांनी जर मनात आणले असते, तर मराठा समाजाचे अनेक प्रश्न सुटले असते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे पवार यांच्या विरोधात बारामती येथे एल्गार परिषद घेण्यात येईल.
४. नोकर भरती प्रक्रिया रहित करावी अशी आमची मागणी नाही; मात्र किमान एक मासासाठी तरी भरती पुढे ढकलावी. ज्यामुळे मराठा युवकांना न्याय मिळेल.