कुणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज आणि देश यांना प्राधान्य देतो ! – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
नगर – शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेणार्या अण्णा हजारे यांनी उपोषणापूर्वीच माघार घेतली. त्यामागची कारणेही त्यांनी स्पष्ट केली आहेत. तथापि अण्णांनी उपोषण जाहीर करून ते मागे घेण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे म्हणत शिवसेनेचे मुखपत्र असणार्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात अण्णांच्या उपोषणामागच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.
याविषयी अण्णांनी तीव्र शब्दांत अप्रसन्नता व्यक्त करत ‘समाज आणि देश यांच्या दृष्टीने घातक कृत्य घडतात, तेव्हा आम्ही आंदोलन करतो. कोणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज आणि देश यांना प्राधान्य देतो’, अशी भूमिका मांडली. तसेच तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही तो कसा पाठीशी घातला ?, याविषयीची सगळी माहितीच देईन, अशी आक्रमक भूमिका घेत अण्णांनी प्रत्युत्तर दिले आहे.