(म्हणे) ‘सरकार ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’च्या विरोधात पोलीस बळाचा वापरत करत आहे !’ – मनोज परब, नेता, ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’
देशद्रोहाच्या गुन्ह्यावरून ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’च्या पदाधिकार्यांचे गुन्हे अन्वेषण विभागाकडून अन्वेषण चालू असल्याचे प्रकरण
पणजी, २९ जानेवारी (वार्ता.) – सरकार ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’च्या (आर्.जी.) सदस्यांच्या विरोधात पोलीस बळाचा वापर करत आहे. ‘आर्.जी.’ या अशासकीय संस्थेचे राजकीय पक्षात रूपांतर करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे आणि यासाठी ‘आर्.जी.’च्या सदस्यांच्या विरोधात खोटी प्रकरणे नोंदवली जात आहेत, असा आरोप ‘आर्.जी.’चे समन्वयक मनोज परब यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केला. मनोज परब पुढे म्हणाले, ‘‘आर्.जी.’ राजकारणात उतरत असल्याने याला अडथळा आणण्याचा हा प्रकार आहे.’’
‘आर्.जी.’चे समर्थक असलेले लेस्टर अफोन्सो यांनी हल्लीच ‘सपोर्टर्स ऑफ रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ या ‘फेसबूक पेज’वर ‘गोवा राज्य’ भारतापासून निराळे करता येऊ शकते का ?’, असा देशद्रोही प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने संशयित लेस्टर अफोन्सो आदींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट केला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या मते देशद्रोही ‘पोस्ट’ प्रसारित करण्यामागे ‘आर्.जी.’च्या वरिष्ठ अधिकार्यांचा हात असल्याचे अन्वेषणातून समोर आले आहे. यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग ‘आर्.जी.’च्या सदस्यांचे अन्वेषण करत आहे.