वेंगुर्ला येथील नगरवाचनालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
वेंगुर्ला – भाषेतील ग्रंथ व्यवहारातूनच कोणतीही भाषा जिवंत रहाते आणि समृद्ध होते. त्यातील माहितीचे संप्रेक्षण व्हावे, या हेतूने लेखन करणारे त्या विषयातील अभ्यासक, संशोधक, लेखक, कवी यांच्याकडून ग्रंथनिर्मिती केली जाते. नगरवाचनालय वेंगुर्ला ही संस्था वाचनाभिमुख वातावरणातून कार्य करत आहे. साहित्यिक, व्यासंगी वाचक पुरस्कार, विविध स्पर्धांचे आयोजन करून प्रत्यक्ष वाचन चळवळ बळकट करत आहेत, असे प्रतिपादन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त वीरधवल परब यांनी ग्रंथप्रदर्शनाच्या शुभारंभी केले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा करण्यात येणार्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे’ औचित्य साधून वेंगुर्ला येथील नगरवाचनालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे उपकार्यवाह नंदन वेंगुर्लेकर, कार्यकारी मंडळ सदस्य प्रा. महेश बोवलेकर, दीपराज बिजितकर, रमेश पिंगुळकर, सत्यवान पेडणेकर, एस्.एस्. काळे, नाना कांबळी, जगदीश तिरपुडे, प्रकाश वेंगुर्लेकर, गुरुनाथ बांदवलकर, संभाजी येरागी यांच्यासह वाचक सभासद उपस्थित होते. या ग्रंथप्रदर्शनात कथा, कादंबर्या, चरित्र, ऐतिहासिक, ज्योतिष, आरोग्य, नाटक, शिक्षण, प्रवास, धार्मिक, तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ग्रंथ मांडण्यात आले होते. प्रास्ताविकात कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना संस्थेत असणार्या विविध विषयांवरील पुस्तकांची माहिती व्हावी, यासाठी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.