‘बालभारती’ची स्वत:ची शैक्षणिक वाहिनी चालू होईल ! – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
पुणे – ‘बालभारती’च्या वतीने वर्षभरात स्वत:ची शैक्षणिक वाहिनी चालू केली जाईल. यात बालचित्रवाणीतील चांगले शैक्षणिक साहित्य पुनरुज्जीवित करून त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न रहाणार आहे, असे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
त्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) संस्थेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त आणि किशोर मासिकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिक्षण घेता आले नाही. त्यांची शैक्षणिक हानी होऊ नये म्हणून शिक्षण विभागाच्या ‘यू-ट्युब’, ‘फेसबूक लाईव्ह’ आदी माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी ४२६ तज्ञ समुपदेशक उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.