राजदीपाखाली अंधार !
इंडिया टुडे या वाहिनीचे संपादक राजदीप सरदेसाई यांच्या एका खोट्या ट्वीटमुळे वाहिनीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना २ आठवडे बातम्यांचे सूत्रसंचालन न करणे आणि १ मासाचे वेतन न देण्याची शिक्षा देण्यात आली आहे. देहली येथील शेतकरी आंदोलनाविषयी त्यांनी एक छायाचित्र आणि माहिती ट्वीट करतांना सांगितले की, ४५ वर्षांचे नवनीत सिंह या शेतकर्याचा मृत्यू पोलिसांच्या गोळीबारात झाला असून शेतकर्यांनी मला सांगितले की, त्यांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही. जेव्हा शवविच्छेदन करण्यात आले, तेव्हा शेतकर्याचा मृत्यू ट्रॅक्टर उलटून झालेल्या दुखापतीमुळे झाला, असे लक्षात आले. तेव्हा राजदीप सरदेसाई तोंडावर आपटले. राजदीप केवळ ट्वीट करूनच थांबले नव्हते, तर ते घेत असलेल्या कार्यक्रमात त्यांनी सरकारला शेतकर्यांच्या मृत्यूविषयी कठोर प्रश्न विचारले होते, म्हणजे पूर्णपणे खोटी माहिती स्वत:च्या ट्विटर खात्यावरून देऊन वर वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. राजदीप सरदेसाई, काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि अन्य ५ पत्रकार यांवर देहली येथील हिंसाचाराविषयी सामाजिक माध्यमांतून खोटी माहिती पोस्ट केल्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा उत्तरप्रदेश पोलिसांनी नोंदवला आहे.
वस्तूनिष्ठ वार्तांकनाची वानवा
राजदीप सरदेसाई यांच्यासारख्या संपादकासह अन्य पत्रकारांवर खोट्या बातम्यांमुळे गुन्हे नोंद होणे, ही गंभीर गोष्ट आहे. यातून ब्रेकिंग न्यूज देणार्या आणि जणू सर्वांत आधी स्वत:कडे एकमेव माहिती असल्याच्या अविर्भावात रहाणार्यांना चांगलाच चाप बसला, असे म्हणावे लागेल. देहली येथील शेतकरी आंदोलनात झालेली हिंसा देशाने पाहिली. शेतकर्यांकडून नियोजित मार्ग पालटणे, आंदोलनाची ठिकाणे पालटणे, पोलिसांवर तलवारी उगारणे, त्यांच्या अंगावर गाड्या घालणे, लाल किल्ल्यावर शीख धर्मियांचा झेंडा फडकावणे या चुकीच्या कृती घडत होत्या; मात्र प्रारंभी या आंदोलनाचे वार्तांकन योग्य प्रकारे करण्यात येत नव्हते. आंदोलनात खलिस्तानवादी अगदी पहिल्या दिवसापासून सहभागी होऊन आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न करत असतांना, तसेच आंदोलनाआड खलिस्तानचे समर्थन करत असतांना प्रसारमाध्यमांनी योग्य भूमिका प्रथम घेतली नाही. तुरळक माध्यमांनी योग्य प्रकारे वार्तांकन करण्याचा प्रयत्न केला.
शेतकर्यांच्या आंदोलनात खलिस्तानी ध्वज फडकावले जात असून आणि गुंडाचाही भरणा झाल्यावर सुदर्शन वाहिनीच्या पत्रकाराने शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या सहकार्याला तुम्ही खलिस्तान मुर्दाबाद, असे म्हणणार का ?, असा नेमकेपणाने आणि थेट प्रश्न विचारल्यावर त्याने असे काही नाहीच आहे, तर निषेध का करावा ?, असे सांगण्याचा प्रयत्न केला. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलनातील खलिस्तानींच्या सहभागाविषयी काहीही भूमिका घेतली नाही, ना त्यांचा निषेध केला. तेव्हा टिकैत यांनाही याविषयी खडसावण्याचा प्रयत्न अन्य माध्यमांनी का केला नाही ?, हा प्रश्न अनुत्तरीत रहातो. झी न्यूजने त्यांच्या डीएन्एच्या कार्यक्रमात वस्तूनिष्ठ भाग दाखवत आंदोलनात खलिस्तानवादी होते, असे स्पष्टपणे नमूद केले. त्यांनी वार्तांकन करतांना या आंदोलनामुळे झालेली हानी दाखवली. त्यांनी केलेल्या या वार्तांकनाचा व्हिडिओ ९० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला. सत्य बाजू वार्तांकनातून दाखवण्याचा प्रयत्न केल्यामुळे लोकांचा अधिक प्रतिसाद लाभला, असे येथे म्हणावे लागेल. अशी वाहिनी असणे आणि त्यावरही अशी सत्य माहिती एकत्रित करून चांगला कार्यक्रम घेणे हे आशादायी आहे. लोकांना सत्य माहितीची अपेक्षा असते, त्यातून त्यांचीही समाजातील प्रश्नांकडे पहाण्याची दिशा ठरते.
राजदीप यांच्या चुका
मुख्य प्रसारमाध्यमांमधून वस्तूनिष्ठ माहिती न मिळाल्याने लोक सामाजिक माध्यमांवर भिस्त ठेवतात. त्यात कार्यरत अनेक राष्ट्रप्रेमी योग्य माहिती पुराव्यांनिशी लोकांपुढे उपलब्ध करत असतात. परिणामी त्यांना सामाजिक माध्यमांवर अनेक फॉलोअर (सदस्य) असतात. राजदीप यांच्या सामाजिक माध्यमांचाही अपलाभ घेण्याच्या प्रयत्नात स्वत:ची नाचक्की करून घेतली. राजदीप यांनी अशा घोडचुका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे रुग्णालयात असतांना एक दिवस राजदीप यांनी त्यांच्या निधनाविषयी ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तेव्हा मुखर्जी यांच्या मुलाने त्यांचे वडील अद्याप जिवंत असून हे वृत्त खोटे आहे, असे सांगितले. शेतकर्यांच्या प्रकरणातही राजदीप यांची चूक अक्षम्य आहे. त्यांच्यावर केवळ वरवरची कारवाई न करता त्यांना वाहिनीतून कायमचे काढण्यासारखी कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. त्यांनी या आधी देहली येथील सीएएच्या विरोधात झालेल्या आंदोलनाच्या वेळी झालेल्या दंगलीत धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात हिंदूंची हानी झालेली होती. असे असतांना हिंदुत्वनिष्ठ कपिल मिश्रा हे कसे दंगलीला उत्तरदायी आहेत, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही त्यांची छी थू झाली. सरदेसाई यांनी त्यांच्या वैयक्तिक ट्विटर खात्यावरून जरी ट्वीट केले असले, तरी इंडिया टुडेलाच लोकांनी नावे ठेवली. यातून इंडिया टुडेची नाचक्की झाली. या आधी ते एन्डीटीव्ही वाहिनीवर कार्यरत होते. तेथे त्यांचा व्यवस्थापनासह वाद झाला आणि त्यांची तेथून हकालपट्टी करण्यात आली. तेथे असतांना त्यांनी गुजरात येथे दंगल झाल्यानंतर काही वर्षांनी झालेल्या निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी हे दंगलीला कसे उत्तरदायी आहेत, त्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर ठेवणे कसे आवश्यक आहे, हे त्यांनी टाहो फोडून सांगण्याचा प्रयत्न केला. स्वत:च्या हातात एक प्रसारमाध्यम असतांना त्याचा वापर पूर्वग्रहदूषितपणामुळे करून त्यांनी मोदींविरुद्ध अपप्रचारच केला; मात्र लोकांनी मोदी यांनाच पुन्हा मुख्यमंत्री केले. असे सातत्याने होत असतांनाही राजदीप हे सुधारण्याचे नाव घेत नाहीत. त्यांच्याकडून अशा चुका स्वीकारल्या जात नाहीत, असे दिसते. त्यामुळे त्यांच्यावर या प्रकरणाच्या निमित्ताने कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रप्रेमींनी वाहिनीकडे करायला हवी. त्यामुळे त्यांच्या कंपूतील इतरांनाही जाणीव होऊन पत्रकारितेची गुणवत्ता टिकून राहील.