कर्तेपणा घेणे हा अहंचा पैलू नष्ट होण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांच्या संदर्भात रामनाथी आश्रमात श्री जगन्नाथ देवतेच्या मूर्तीस्थापनेचा सोहळा चालू असतांना आलेल्या अनुभूती !

मी कुठलीही सेवा केल्यावर माझ्यातील कर्तेपणा घेणे या तीव्र अहंच्या पैलूमुळे माझ्या मनात कर्तेपणाचे विचार येत असत. आमच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केल्याने आता पूर्वीच्या तुलनेत मनात कर्तेपणाचे विचार येण्याचे प्रमाण अल्प झाले आहे.

श्री. अपूर्व ढगे

१. कर्तेपणाचे विचार नष्ट होण्यासाठी परात्पर गुरुदेवांना हृदयात स्थान द्यायचे आणि मनात कर्तेपणाचे विचार आल्यास हृदयातील परात्पर गुरुदेवांना सांगायचे, असा निश्‍चय करणे

मी कर्तेपणाचे विचार नष्ट होण्यासाठी प्रयत्न करत असतांना एकदा परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे मला सुचले, आजपासून परात्पर गुरुदेवांना हृदयात स्थान द्यायचे. माझे कुणी कौतुक केले, तरी ते माझे कौतुक करत नसून गुरुदेवांचेच करत आहेत, असा भाव ठेवायचा, असा मी निश्‍चय केला. त्यानंतर माझ्या मनात कर्तेपणाचे विचार आल्यास मी हृदयातील परात्पर गुरुदेवांना त्याविषयी सांगत होतो.

२. श्री जगन्नाथ देवता आणि हृदयात असलेले परात्पर गुरुदेव एकच असल्याविषयी आलेली अनुभूती

२ अ. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात श्री जगन्नाथाच्या मूर्तीच्या स्थापनाविधीच्या सोहळ्याचे प्रक्षेपण बघत असतांना छातीमध्ये काहीतरी जात असून कुणीतरी मोठी शक्ती शरिरात प्रवेश करत आहे, असे जाणवणे : त्यानंतर ३ – ४ दिवसांनी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात श्री जगन्नाथ देवतेच्या मूर्तीचा स्थापनाविधी होता. त्या वेळी सकाळी संकल्प विधीच्या सोहळ्याचे प्रक्षेपण बघत असतांना माझ्या पायांतून पुष्कळ कळा येत होत्या. मला त्रास असह्य झाल्याने मी परात्पर गुरुदेवांना कळवळून प्रार्थना करत होतो. त्याच वेळी मला छातीमध्ये पुष्कळ दाब जाणवत होता. छातीमध्ये काहीतरी जात असून कुणीतरी मोठी शक्ती माझ्या शरिरात प्रवेश करत आहे, असे मला जाणवत होते. मला ते सहन झाले नाही.

२ आ. सेवेच्या ठिकाणी गेल्यावर अस्वस्थता जाणवून नंतर शांत होणे : मी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केली, गुरुदेव, मला काय होत आहे, हे मला काहीच कळत नाही. हे सर्व पेलवणे माझ्या क्षमतेच्या पलीकडचे आहे. तुम्हीच मला सांभाळा. नंतर मला रडू येऊ लागले. तेव्हा माझ्या छातीत पुष्कळ दाह होत होता. त्या वेळी श्री जगन्नाथ मूर्तीवर पूजाविधी चालू होते. मी सेवेच्या ठिकाणी गेल्यावरही मला पुष्कळ अस्वस्थता जाणवत होती. त्यानंतर १५ मिनिटांनी मी शांत झालो.

३. गुरुदेवांना हृदयात ठेवायचा केलेला निश्‍चय आणि श्री जगन्नाथ देवतेच्या स्थापनेच्या वेळी झालेला संकल्प, हे दोन्ही एकच असल्याचे लक्षात येणे आणि संकल्पविधीच्या वेळी शरिरात प्रवेश केलेली शक्ती, म्हणजे साक्षात परात्पर गुरुदेव असल्याचे जाणवणे

मी ३ – ४  दिवसांपूर्वी घडलेल्या घटना आणि त्रास यांविषयी चिंतन केले. त्या वेळी ३ – ४ दिवसांपूर्वी कर्तेपणा या अहंच्या पैलूवर मात करण्यासाठी मी प्रत्येक कृती करतांना गुरुदेवांना हृदयात ठेवायचा निश्‍चय केला होता, हे माझ्या लक्षात आले. माझा हा निश्‍चय आणि श्री जगन्नाथ देवतेच्या स्थापनेच्या वेळी झालेला संकल्प, हे दोन्ही एकच असल्याचे माझ्या लक्षात आले. माझ्या शरिरात प्रवेश केलेली शक्ती, म्हणजे साक्षात परात्पर गुरुदेव होते आणि त्यांचीच माझ्या हृदयात स्थापना झाली होती. श्री जगन्नाथ देवतेच्या मूर्तीच्या स्थापनेच्या कार्यक्रमात सूत्रसंचालकांनीही श्री जगन्नाथ देवता आणि परात्पर गुरुदेव एकच आहेत, असे सांगितले.

तेव्हा माझ्या हृदयातील परात्पर गुरुदेवांचा स्थापना विधी झाला असून परात्पर गुरुदेवांनी मी केलेल्या निश्‍चयाला पाठिंबा दिला आहे, असे वाटून माझी त्यांच्याप्रती कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.

– श्री. अपूर्व ढगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक