कर्नाटकचा राजकीय दहशतवाद संपवावाच लागेल ! – शिवसेना
मुंबई – बेळगावसह सीमा भागातून मराठी भाषा, संस्कृतीच्या खुणा उखडून टाकण्याचा चंग कानडी सरकारने बांधला आहे. हा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद आहे. तो संपवावाच लागेल, अशी भूमिका शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून मांडली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमा भागातील मराठी भाषिक प्रदेशाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तो प्रदेश तोपर्यंत केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. त्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुंबई हा कर्नाटकचा भाग असल्याची मुक्ताफळे उधळली होती. त्यावर ‘सामना’मध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राला कर्नाटकची अर्धा इंचही भूमी नको. महाजन अहवालानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला भूभाग आणि त्याशिवाय कर्नाटकमध्ये जबरदस्तीने कोंबलेला मराठी भाग, जो महाराष्ट्राच्या हक्काचा आहे, तेवढाच तुकडा महाराष्ट्राला हवा आहे. बेळगावची लढाई त्यासाठीच चालू आहे. बाकी दोन राज्यांत कोणताही वादाचा विषय नाही.
१. लडाखच्या सीमेवर चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसून बसले. त्यांना बाहेर काढले जात नाही; पण बेळगावसह सीमा भागातील मराठी बांधवांचा न्याय्य हक्काचा लढा मात्र चिरडला जात असल्याचा आरोप भाजप सरकारवर करण्यात आला आहे.
२. ‘मुंबईतसुद्धा भरपूर कानडी लोक राहतात, म्हणून मुंबई शहर कर्नाटकास जोडा’ असे एक विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले आहे. सवदी यांनी १०५ संयुक्त महाराष्ट्र हुतात्म्यांचाच अपमान केला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
३. सवदी हे भाजपचे पुढारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील यच्चयावत् भाजप पुढार्यांचे यावर काय म्हणणे आहे ? एरवी ऊठसूट शब्दांचा खुळखुळा वाजवणारे हे लोक सवदींच्या विधानांचा साधा निषेध तरी करणार आहेत कि नाही ?,असा प्रश्नही यात विचारला आहे.
४. सीमा भागात मराठी शाळा, ग्रंथालये, कलाविषयक संस्थांवर पोलीस कारवाई करत आहेत. बेळगाव महानगरपालिकेवरील भगवा झेंडा उतरवला गेला आणि मराठी द्वेष इतक्या पराकोटीस गेला की, येळ्ळूर गावातील छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा जेसीबी लावून उचलण्यात आला. हे वातावरण अन्यायाचे आहे आणि कानडी सरकार मराठी बांधवांशी याच बेलगाम पद्धतीने वागणार असेल, तर ‘सीमा भाग केंद्रशासित करा’ या मागणीशिवाय दुसरा कोणताही पर्याय महाराष्ट्रापुढे उरत नसल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे.