साम्यवाद , लोकशाही आणि विज्ञानवाद यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्याने देशाला नवी दिशा शोधावी लागेल ! – गिरीश पुजारी, मुख्य समुद्री अभियंता
मिरज, २८ जानेवारी (वार्ता.) – स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण लोकशाही मार्गाने चाललो आहोत; परंतु लोकशाहीत वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वार्थी वृत्ती आणि भ्रष्टाचार बोकाळला आहे. कर्तव्याचा विसर पडल्याने स्वार्थी आणि वितंडवादी संघटना लोकशाहीत समाजविघातक कृत्ये करून समाजाला वेठीस धरत आहेत. साम्यवादी विचारातून हुकूमशाही, लोकशाही मार्गाने भांडवलशाही निर्माण होणे, तसेच विज्ञानवादाने भोगवाद निर्माण होत आहे. अशा मर्यादा आज स्पष्ट झाल्याने देशाला नवी दिशा शोधावी लागेल, असे प्रतिपादन मुख्य समुद्री अभियंता श्री. गिरीश पुजारी यांनी केले.
गुजरात ते मुंबई या समुद्रातील प्रवासमार्गात एम्.टी. सक्सेस, जहाजावर प्रजासत्ताक दिनानिमित्ताने झेंडावंदन कार्यक्रम झाल्यानंतर श्री. पुजारी यांनी जहाजावर सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना संबोधित करतांना वरील मत व्यक्त केले.
१. वैज्ञानिकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर झाल्याने जगाची वाटचाल जैविक युद्धाकडे चालू आहे.
२. योगी अरविंद यांनी वर्ष १९४५ मध्ये आध्यात्मिक आणि सांस्कृतिक भारताच्या पुनर्निर्माणातून देश जगाचे नेतृत्व करेल, असे सांगितले होते.
३. राष्ट्रीय प्रतीक असलेली सन्मानचिन्हे, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रभाषा आणि भारतीय संस्कृती यांचा अभिमान जागवून देशभक्ती वाढवूया.
क्षणचित्र – झेंडावंदन झाल्यानंतर जहाजाचे कप्तान श्री. दीपक सिंह आणि जहाजावरील सर्व सहकारी, कर्मचारी यांनी सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले.