वरगांव (पिळगाव) येथील श्री चामुंडेश्वरीदेवीचा जत्रोत्सव !
वरगाव (पिळगाव) येथील श्री चामुंडेश्वरीदेवीच्या जत्रोत्सवाचा पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा (२९.१.२०२१) हा मुख्य दिवस आहे. त्या निमित्ताने या देवस्थानविषयीची माहिती येथे देत आहोत.
पूर्वेतिहास !
श्री चामुंडेश्वरी मातेचे मंदिर थोरले गोवे (Goa Velha) येथे एका डोंगरावर निसर्गरम्य अशा भागांत होते. या देवालयाच्या पुढे एक तळे होते. अजूनही या देवालयाचे अवशेष आणि तळे त्या ठिकाणी आहेे. हे देवालय मलिक कफूरने ख्रिस्ताब्द १३१२ मध्ये उद्ध्वस्त केले. तेथून श्री चामुंडेश्वरीची मूर्ती वरगांव येथे कशी नेण्यात आली, कुठून नेण्यात आली, याचा स्पष्ट पुरावा सापडत नाही; पण हे देवालय चांगल्या स्थितीत असले पाहिजे, कारण गोवा बेट ही कदंब राजाची राजधानी होती आणि श्री देवी चामुंडेश्वरी कदंब राजाची कुलदेवता होती. पिळगाव नजीक वरगाव येथे (डिचोली तालुका) श्री देवी चामुंडेश्वरीची मूर्ती मडकई, कुंडई, माशेल अथवा आमोणे या भागांतून नेली असावी. जुने गोवे, आगशीची जनता अजूनही श्री चामुंडेश्वरीला आपली ग्रामदेवता मानतात आणि तिच्या दर्शनाला न चुकता येतात.
देवस्थानची रचना !
देवालयाची जागा अत्यंत प्रसन्न अशी आहे. देवालयाच्या सभोवती आंबे, फणस, काजू इत्यादी प्रकारची झाडे आहेत आणि त्यामुळे देवालयाची जागा अगदी रम्य वाटते. देवालयाच्या बाजूलाच एक भव्य तळे असल्यामुळे देवालयाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. श्री देवी चामुंडेश्वरीचे देऊळ फार जुने आहे; अनेक वेळा त्याचा जीर्णोद्धारही झालेला आहे.
श्री चामुंडेश्वरी संस्थान वरगांव-पिळगांव या संस्थानचे वैशिष्ट्य म्हणजे देवालयाचे महाजन गोवेकर, आमोणकर, टोपले, कांगणे, दड्डीकर हे वैश्य आहेत. हे देवस्थान केवळ वैश्यांचेच आहे. श्री चामुंडेश्वरीचे देवालय आणि या परिसरांतील इतर देवालये महाजनांनीच बांधलेली आहेत. इतर समाजांतील वरील आडनावांचे सर्व तिचे भक्तजन आहेत. तेही श्री चामुंडेश्वरीला आपली कुलदेवता मानतात; पण वैश्य सोडून इतर जातीचे भक्त या देवस्थानचे महाजन नाहीत.
कौलप्रसाद !
श्री चामुंडेश्वरीच्या देवस्थानात कौलप्रसाद घेण्यासाठी गोमंतकाच्या कानाकोपर्यातून भक्तगण येतात. प्रतिदिन ३०-४० भाविक कौलप्रसाद घेण्यासाठी देवळात असतात. देवीला कौल लावण्याचीही एक पद्धत आहे. श्री देवीला करमलीच्या पानांनी कौल लावला जातो; कारण करमलीची झाडे देवीला अत्यंत प्रिय आहेत.
जत्रोत्सव
पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा हा देवालयाचा जत्रोत्सवाचा दिवस. या दिवशी गोव्याच्या कानाकोपर्यातून, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून असंख्य महाजन, भक्तगण येतात. या दिवशी रात्री श्री देवीला भक्तजनांनी अर्पण केलेल्या वस्तूंची पावणी (लिलाव) होते. भाविक भावूक अंतःकरणाने या लिलावांत भाग घेतात. ठीक ११ वाजता श्री देवी चामुंडेश्वरीची पालखी प्रदर्शनास बाहेर पडते. भाविकांचे स्वागत स्वीकारून श्रींची पालखी नौकाविहारासाठी मोठ्या तळ्याजवळ येते आणि नौकाविहाराचा नेत्रदीपक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडतो. नंतर श्रींची पालखी सभामंडपात येते आणि सज्जावर श्री देवी चामुंडेश्वरीची मूर्ती विराजमान होते. नंतर वर्षपद्धतीप्रमाणे मोचेमाडकर मंडळींच्या दशावतारी नाटकाचा प्रयोग चालू होतो.
संपूर्ण वर्षात अनेक उत्सव उत्साहाने, उन्मेषाने, उमेदीने आणि सर्वांच्या सहकार्याने साजरे होत असल्याने देवालयात भाविक आणि महाजन नियमितपणे येतात.
(संदर्भ : लेखक – प्राचार्य रधुनाथ अनंत टोपले, ग्रंथ : ‘प्राणशक्ती श्री चामुंडादेवी’)