मार्च अखेर सनबर्न महोत्सव साजरा करण्याविषयी आयोजकांकडून शासनाला अर्ज
पणजी, २८ जानेवारी (वार्ता.) – गोव्यात २७ ते २९ मार्च या कालावधीत सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हलचे आयोजन करण्यास अनुमती देण्याची मागणी करणारा अर्ज महोत्सवाच्या आयोजकांनी शासनाला दिला आहे. या वृत्ताला पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनीही दुजोरा दिला आहे.
पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर म्हणाले, मार्चअखेर सनबर्न महोत्सव साजरा करण्यासाठी आयोजकांनी शासनाकडे अर्ज केलेला आहे; मात्र शासनाने महोत्सवाला तत्त्वत: मान्यता देण्यासंबंधी अजूनही निर्णय घेतलेला नाही. प्राप्त माहितीनुसार विधानसभेचे हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर या महोत्सवाच्या आयोजनाला शासन अनुमती देऊ शकते. शासनाने सनबर्नचे आयोजक पर्सेप्ट लाईव्ह यांना गतवर्षी २७ ते २९ डिसेंबर २०२० या कालावधीत वागातोर येथे सनबर्न महोत्सवाचे आयोजन करण्यास अनुमती दिली होती; मात्र कोरोना महामारी असतांना सनबर्नला अनुमती दिल्याने मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यावर शासनाने ही अनुमती नंतर मागे घेतली होती.