‘ऑनलाईन’ नामजप सत्संग पाहून साधकांचे नातेवाईक आणि त्यांचे परिचित यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद !
दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने जिज्ञासूंसाठी चालू करण्यात आलेले ‘ऑनलाईन’ नामजप सत्संग आणि ‘धर्मसंवाद’ यांचा त्यांना लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले. २८ जानेवारीला आपण उत्तरप्रदेशमधील अशा काही जिज्ञासूंना जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती पाहिल्या. आज २९ जानेवारीला ‘ऑनलाईन’ नामजप सत्संग पाहून साधकांचे नातेवाईक आणि त्यांचे परिचित यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद पाहूया.
१. सौ. सुमन राणा, फरिदाबाद
१ अ. ‘माझ्या बहिणीचे यजमान (जीजाजी) श्री. चमेल सिंह (हे हिमाचल प्रदेशात रहातात.) यांनी मला सांगितले, ‘ऑनलाईन’ नामजप सत्संग ऐकून आणि पाहून तुम्ही अतिशय चांगल्या संस्थेशी जोडल्या गेल्या आहात’, हे माझ्या लक्षात आले. सत्संग ऐकून मला पुष्कळ चांगले वाटते.’’
१ आ. सत्संग ऐकून यजमानांच्या स्वभावात पालट जाणवणे आणि त्यांनाही सत्संग चांगला वाटणे : माझे यजमान मला पुष्कळ रागवायचे आणि इतरांसमोर माझा अपमानही करायचे. यजमान बाहेरगावी रहातात आणि सुटीत घरी येतात. मी प्रतिदिन सत्संग ऐकते. या वेळी यजमान घरी आल्यापासून तेही प्रतिदिन सत्संग ऐकत आहेत. त्यांना सत्संग चांगला वाटतो. या वेळी ते घरी आले असतांना मला त्यांच्या वागणुकीत पुष्कळच पालट झाल्याचे दिसून आले.
१ इ. माझ्या परिचयातील श्री. राजेश लष्करात आहेत. मी त्यांना सत्संगाची लिंक पाठवत होते. त्यांनी सांगितले, ‘‘हा सत्संग ऐकल्यानंतर मला पुष्कळ आनंद होतो. तुम्ही मला अतिशय चांगली गोष्ट दिली आहे.’’
१ ई. माझ्या मामी श्रीमती सुदेश रानोत (सेक्टर २९ फरीदाबाद) यांनी नामजप सत्संग ऐकल्यावर सांगितले, ‘‘मला पुष्कळ चांगला सत्संग मिळतो.’ त्यांनी स्वतःहून मला विचारले, ‘‘आम्हाला गुरुपौर्णिमेचा सत्संग ऐकायला मिळू शकेल का ?’’
२. श्रीमती निशा वर्षनेय, फरीदाबाद
अ. मला सत्संगाविषयी सांगितले आणि त्याची स्मरण सूचना वारंवार वाचल्यावर माझ्या मनात सत्संग पहाण्याची इच्छा निर्माण झाली. ज्या साधकांनी मला सत्संगाशी जोडले, त्या संस्थेच्या साधकांप्रती मी पुष्कळ कृतज्ञ आहे.
आ. आता मी प्रतिदिन सौ. क्षिप्रा जुवेकर घेत असलेले ‘भावसत्संग आणि नामजप सत्संग’ ऐकते.
इ. मी नामजप करणे चालू केल्यापासून मला घरात पुष्कळ सात्त्विकता जाणवते. मला नामजप करतांना अनेक वेळा अश्रू येतात.
ई. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सांगितल्यामुळे मला पूजा करण्याची योग्य पद्धत समजली. मी पूर्वी पूजा अयोग्य पद्धतीने करत होते.
उ. अनेक लोकांना कदाचित् दळणवळण बंदीमुळे हानी पोचली असेल; परंतु ‘मला भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही स्तरांवर लाभ झाला आहे’, यासाठी मी सनातन संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करते.
(समाप्त)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |