राजकारणातील ‘क्षमा’ !
मनुष्य अनेक चुका करतो. त्यांची वारंवार पुनरावृत्तीही होत असते; पण या चुकांची मनुष्याला जाणीव असते का ? याचे उत्तर नकारार्थीच येईल. स्वतःच्या चुका तर सोडाच; पण अन्यांचे दायित्व आपल्यावर असतांना त्यांच्याकडून होणार्या चुका सुधारण्यासाठी मनुष्य खरंच धडपडतो का कि चुकलेल्यांनाच दोष देऊन तो मोकळा होतो ? यातही दुसरी बाजूच अधिक प्रमाणात सर्वत्र घडत असते; मात्र याला अपवाद ठरले आहेत, ते जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा. त्यांनी चुकलेल्यांना दोष न देता त्यांच्या चुकीसाठी स्वतः क्षमा मागितली आणि एकप्रकारे स्वतःचा आदर्शच जगासमोर निर्माण केला. २७ जानेवारी या दिवशी सुगा यांच्या पक्षातील काही खासदार नाईट क्लबमध्ये गेले होते. कोरोनामुळे जपानमध्ये कठोर निर्बंध लागू केले असतांना खासदारांनी नाईट क्लबमध्ये जाणे अत्यंत चुकीचे आहे; मात्र पंतप्रधान सुगा यांनी खासदारांच्या वतीने संपूर्ण देशाची क्षमा मागितली. ‘खासदारांनीच नियमांचे उल्लंघन केल्याने मी निराश आणि दु:खी झालो आहे’, अशा शब्दांत त्यांनी खंतही व्यक्त केली. खरे पहाता खासदारांच्या अयोग्य वर्तनाविषयी पंतप्रधानांसारख्या अत्युच्च पदावरील व्यक्तीने क्षमा मागण्याची आवश्यकता नव्हती. पंतप्रधान खासदारांना कठोर शब्दांत सुनावून त्यांच्यावर कारवाईही करू शकले असते; पण त्यांनी तसे न करता देशवासियांची क्षमा मागून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करून दाखवले. सुगा हे मृदूभाषी म्हणून ओळखले जातात. यामुळेच कदाचित् त्यांना क्षमा मागणे हे सहजपणे जमले असावे. स्वाभिमान, अभिमान, गर्व आणि ताठरता यांमध्ये अनेकांची गफलत होते; पण सुगा यांनी या सर्वांचा समतोल एका क्षमेच्या माध्यमातून साध्य केला, असे म्हणता येईल. ‘जसा राजा, तशी प्रजा’ किंवा ‘राजा कालस्य कारणम् ।’ या वचनांप्रमाणे पंतप्रधानांच्या क्षमायाचनेनंतर एका खासदाराने स्वतःकडून दायित्वशून्य वर्तन झाल्याचे मान्यही केले.
काही वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांंच्याविषयी वादग्रस्त लेख आणि छायाचित्रे टाकली गेल्याविषयी श्रीलंकेच्या तत्कालीन पंतप्रधानांनी क्षमा मागितली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याआधी जनतेची क्षमायाचना केलेली होती. वर्ष २०१९ मध्ये पर्युषण पर्वात ते म्हणाले, ‘‘मिच्छामी दुक्कडम (क्षमा मागतो) ! मी मनातून, वचनातून, कर्मातून जर कुणाला दुःखी केले असेल, वेदना दिल्या असतील, तर मी जनतेची क्षमा मागतो.’ कोरोनामुळे अचानक दळणवळण बंदी घोषित करावी लागल्याने भारतियांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला. तेव्हाही ‘मन की बात’ या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांची अंतःकरणापासून क्षमायाचना केली. यातूनच मोदी यांच्या अंतःकरणाच्या विशालतेची प्रचीती येते. एखाद्या राष्ट्राच्या पंतप्रधानांनी क्षमा मागणे याद्वारे त्या राष्ट्राचे संपूर्ण विश्वाच्या दृष्टीने असलेले अस्तित्व आणि महत्त्व यांची प्रचीती येते. यातूनच त्या राष्ट्राची प्रगती आणि विकास यांचा पुढील टप्पा आपसूक साधला जातो. क्षमायाचनेचा मार्गच देशाला राष्ट्रोत्कर्षापर्यंत नेतो. त्यामुळे पंतप्रधानांच्या उदाहरणांतून सर्व देशवासियांनी शिकावे.