संख्येऐवजी गुणात्मकता हवी !
भाजपचे उत्तरप्रदेशमधील व्यापार विभागाचे संयोजक विनीत अग्रवाल शारदा यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात ‘जोपर्यंत कुटुंबनियोजनाच्या संदर्भातील नियम बनवला जात नाही, तोपर्यंत आपण ‘हम दो हमारे पांच’चा संकल्प केला पाहिजे’, असे विधान केले. भारताची सव्वाशे कोटी एवढी अवाढव्य लोकसंख्या असतांना एखाद्याने असे विधान करणे तसे आश्चर्यकारक आहे, तसेच वास्तवाची जाण नसणारेही आहे. अधिक मुले जन्माला घालण्यामागील कारण सांगतांना शारदा यांनी एका मुलाला सैन्यात, एकाला राजकारणात, एकाला हत्यारे खरेदी करून मान, मर्यादा आणि प्रतिष्ठा यांचे रक्षण करण्याचे दायित्व, एक व्यापारी आणि एकाला प्रशासकीय सेवेत ठेवावे, असे कारण दिलेे. भारताची भौगोलिक स्थिती आणि साधनसंपत्ती यांचा विचार करता या भूमीवर ४० ते ५० कोटी लोक व्यवस्थित वास्तव्य करू शकतात, असे असतांना दुपटीहून अधिक लोकांचा भार ही भूमी सध्या सहन करत आहे. अशा प्रचंड लोकसंख्येचे पालनपोषण करण्यासाठी सर्व यंत्रणांवर पुष्कळ ताण पडत आहे. तसेच काही ठिकाणी मर्यादाही येत आहेत. हा झाला सारासार विचार; पण तात्त्विकदृष्ट्या काय ?
भारतात कोट्यवधींची लोकसंख्या आहे, त्यातही सरकारी नोकरीतही कोटी लोक आहेत असे मानले, तरी भारताची स्थिती काही क्षेत्रे सोडली, तर बिकट का आहे ? राजकारणात काही लाख लोक आहेत, तरी राजकारण अतिशय खालच्या पातळीपर्यंत का जात आहे ? केवळ स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी राजकारण केल्यामुळे राजकीय वैमनस्यातून हत्या करणे, गुंडगिरी करणे, स्वत:च्या प्रतिष्ठेचा वापर करून अवैध कामे करणे, हाणामार्या करणे हे प्रकार केले जातात. राजकारणाचा समाजकारणासाठी उपयोग करून घेतला अशी उदाहरणे विरळाच आहेत. व्यापारी वर्गात काही प्रामाणिक व्यापार्यांचा अपवाद सोडला, तर वस्तूंची साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण करून लोकांची लुबाडणूक करणे, निकृष्ट धान्य देणे वा धान्यात भेसळ करणे असे प्रकार केले जातात. चीन भारताचे शत्रूराष्ट्र असूनही त्याच्याकडून माल खरेदी केला जातो आणि लोकांना विकून त्याला लाभ मिळवून दिला जातो. अनेक प्रशासकीय अधिकार्यांची घरे नोकरीच्या काळात लाचखोरी आणि अन्य मार्गाने मिळवलेल्या काळ्या धनाने भरलेली आढळतात. अधूनमधून अंमलबजावणी संचालनालय घालत असलेल्या धाडींमध्ये हे लक्षात येते. राजकारण्यांच्या मनानुसार काहींचे वागणे होते. वशिल्याविना आणि एजंटविना सामान्य माणसांची कामे होत नाहीत. भारतात सर्वच यंत्रणा अवाढव्य असतांना सामान्य माणसाचे हित जपले का जात नाही ? शेतकर्यांना आत्महत्या का कराव्या लागतात ?, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पांडव संख्येने केवळ पाच होते; मात्र त्यांनी १०० कौरवांचा पराभव केला; कारण पांडव गुणी, न्यायी, पराक्रमी होते आणि विशेष म्हणजे ते योगेश्वर श्रीकृष्णाचे भक्त होते. या उदाहरणातून संख्या नव्हे, तर गुणांचेच महत्त्व आहे. गुणी अपत्य जन्माला आले, तर ते केवळ स्वत:च्या कुटुंबाचाच नव्हे, तर समाज, राष्ट्र आणि धर्म यांचेही भले करते. म्हणून गुणात्मकतेलाच प्राधान्य हवे !