हाताने खरकटे काढण्याची सेवा करतांना श्रीकृष्णाने स्वतः यज्ञामध्ये उष्ट्या पत्रावळ्या उचलल्याचा प्रसंग आठवून सेवा परिपूर्ण करता येणे
‘८.९.२०२० या दिवशी मी खरकटे आणि ओला कचरा बालदीतून काढण्याची सेवा करत होते. त्या वेळी मी छोट्या बालदीतील खरकटे मोठ्या बालदीत उलटे करून टाकले; पण छोट्या बालदीला आतून खरकटे चिकटलेले होते. ते हाताने काढण्यास मला किळस वाटत होती. ‘तेव्हा माझे काहीतरी चुकत आहे’, याची मला जाणीव झाली. ‘राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने स्वतः उष्ट्या पत्रावळी उचलल्या होत्या. त्या भगवंताशी मला एकरूप व्हायचे आहे’, असे विचार परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझ्या मनात आले आणि सेवा परिपूर्ण करण्याची जाणीव झाली. तेव्हा मी छोट्या बालदीला लागलेले खरकटे कोणताही किंतु मनात न आणता हाताने काढले आणि ‘बालदीला अजून काही अन्नकण चिकटले आहेत का ?’, हे बघून बालदी स्वच्छ धुतली.
‘परात्पर गुरुमाऊली, माझ्या स्थूल आणि सूक्ष्म देहात आपले अस्तित्व आहे. आपल्या अस्तित्वामुळेच माझ्या मनात सकारात्मक अन् योग्य विचार येऊन आपणच माझ्याकडून योग्य कृती करवून घेता’, त्यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. ‘गुरुमाऊली, आपल्याला अपेक्षित अशी साधना माझ्याकडून प्रत्येक क्षणी होऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.९.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |