साधकाला इतरांनी चूक सांगितल्यावर त्याने शिकण्याच्या स्थितीत राहून चूक स्वीकारल्यास त्याच्यावर देवाची कृपा होते ! – सद्गुरु राजेंद्र शिंदे
‘२०.८.२०२० या दिवशी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात एका साधकाने सांगितले, ‘‘माझ्याकडून झालेली चूक एका साधकाने उत्तरदायी साधकांना सांगितली. उत्तरदायी साधकांनी सत्संगात मला माझ्यातील स्वभावदोषांची जाणीव करून दिली. त्या वेळी मी चूक स्वीकारली; मात्र ‘त्या वेळी मी प्रतिक्रियात्मक शब्द वापरले नाहीत’, असे मला वाटल्याने माझ्याकडून प्रसंग पूर्णपणे स्वीकारला गेला नाही. त्यामुळे माझ्या मनाचा संघर्ष झाला. नंतरचे ५ दिवस माझा त्रास वाढला आणि नकारात्मक विचारांत माझा पुष्कळ वेळ वाया गेला.’’ सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्या साधकाला केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन
अ. ‘‘साधकाने शब्दांमध्ये न अडकता न्यूनता घेऊन चूक पूर्णपणे स्वीकारावी. हे स्वीकारतांना त्याच्या मनाचा काही प्रमाणात संघर्ष होऊ शकतो; मात्र त्यामुळे त्रास होणे, नकारात्मक विचार येणे आणि ‘काहीच करायचे नाही’, असे वाटणे, हे टळू शकते.
आ. साधकाने ‘चूक आणि स्वभावदोष समजणे’, ही देवाची कृपा आहे’, हे लक्षात ठेवावे. हा देवाचा प्रसाद समजून चूक पूर्णपणे स्वीकारावी.
इ. देव अन्य साधकांच्या माध्यमातून, म्हणजे समष्टीच्या माध्यमातून चुका आणि स्वभावदोष सांगत असतो. ‘त्या स्वीकारण्यात स्वतःचे कल्याण आहे’, हे साधकाने लक्षात ठेवावे.
ई. ‘साधकातील तीव्र अहंमुळे तो प्रसंगात असा वागतो आणि त्याचे स्वतःवर नियंत्रण रहात नाही’, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘तसे अयोग्य वागणे’, ही त्याची सहज प्रवृत्ती झालेली असते. त्यामुळे त्याने प्रसंगात प्रतिक्रियात्मक बोललेले त्याला स्वतःला त्या वेळी लक्षात येत नाही. दिवसभरात मनात येणार्या अयोग्य विचारांची त्या त्या वेळी नोंद न ठेवल्याने नंतर स्वभावदोष सारणी लिहतांना ते आठवत नाहीत. असे होत असल्याने काही दिवसांपूर्वी किंवा आठवड्यांपूर्वी बोललेले शब्द साधकाला कसे आठवणार ?; परंतु ज्या साधकाच्या विषयी प्रसंग घडलेला असतो, त्याला ते शब्द व्यवस्थित आठवत असतात; म्हणून साधकाने ते स्वीकारायला हवे.
उ. ‘साधकामध्ये तीव्र अहंभाव आणि अतिआत्मविश्वास असल्यास त्याला स्वतःचे स्वभावदोष आणि चूक स्वीकारता येत नाही’, हे लक्षात ठेवावे.
ऊ. साधकाने साधना करतांना ‘या प्रसंगात देवाला काय आवडेल ?’, असा विचार करून चूक स्वीकारली, तर त्याच्यावर देवाची कृपा होणार आहे’, हे लक्षात ठेवावे.
ए. सर्व गोष्टी बुद्धीने समजून घेता येत नाहीत. देव बुद्धीच्या पलीकडे आहे. ‘देवाशी एकरूप व्हायचे असल्यास मनोलय आणि बुद्धीलय व्हायला हवा’, हे लक्षात ठेवून चूक अन् स्वभावदोष मनापासून स्वीकारले पाहिजेत.
ऐ. प्रत्येक प्रसंग घडण्यामागे अनेक कारणे असतात. साधकाने ते समजून घेण्यात वेळ खर्च करण्यापेक्षा ‘देवच समष्टीच्या माध्यमातून सांगत आहे’, असा भाव ठेवून मनापासून चूक स्वीकारावी.
ओ. साधक भगवंताला दिवसातून अनेक वेळा ‘मला माझ्या चुका आणि स्वभावदोष कळू देत’, अशी प्रार्थना करतात. या प्रार्थनेला अनुसरून जेव्हा भगवंत समष्टीच्या माध्यमातून स्वभावदोष आणि चुका दाखवून देतो, तेव्हा देवाने केलेले हे साहाय्य साधकाने कृतज्ञताभावाने स्वीकारावे.
औ. साधकाने चुका स्वीकारून त्वरित क्षमायाचना करावी. त्यामुळे पापक्षालन होण्यास साहाय्य होते.
अं. साधकांमध्ये चुका स्वीकारण्याची वृत्ती आणि त्यातून शिकण्याची वृत्ती निर्माण झाल्यास भगवंत त्या साधकाला त्याच्या स्वतःच्या लक्षात न आलेले अनेक स्वभावदोष आणि अहंचे पैलू दाखवून साहाय्य करतो अन् त्याला साधनेत लवकर पुढे घेऊन जातो. त्यामुळे अशा साधकांकडून चुका टाळल्या जातात.’’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.८.२०२०)