पू. शालिनी नेनेआजी यांच्या अस्थीविसर्जनाच्या वेळी त्यांची कन्या श्रीमती अनुपमा देशमुख यांना जाणवलेली सूत्रे
१. कर्जतला उल्हास नदीमध्ये पू. नेनेआजींच्या अस्थींचे विसर्जन करण्याचे ठरणे आणि देवद आश्रमातील साधक अन् पू. नेनेआजींची कन्या कर्जत येथे एका ठिकाणी एकत्र भेटणे
१८.१.२०२० या दिवशी पू. आईचे (पू. नेनेआजींचे) देहत्यागाचा ९ वा दिवस होता. या दिवशी कर्जतला उल्हास नदीमध्ये अस्थीविसर्जन करायचे होते. त्या वेळचा अनुभव सांगते. पनवेलच्या आश्रमात १०, ११, १२ आणि १३ व्याचे विधी करायचे होते; म्हणून मी पुण्याहून सकाळी ११.३० वाजता पनवेलला येण्यासाठी निघाले आणि पनवेलहून सनातनचे साधक मंडळी श्री. महेंद्र सहस्रबुद्धे आणि श्री. शशांक जोशी, ज्यांनी अंत्यविधीपासून १३ व्यापर्यंतचे सर्व विधी अगदी डोक्यावरील पूर्ण केस कापून शास्त्राप्रमाणे ४ – ६ घंटे बसून केले. या दोघांची मी कायम ऋणी राहीन. ते दोघेही पनवेल येथील देवद आश्रमातून निघाले आणि कर्जतला ठरल्याप्रमाणे आम्ही एका ठिकाणी भेटलो.
२. मंदिराच्या नावाविषयी समन्वयाच्या अभावामुळे योग्य स्थळी पोचण्यासाठी विलंब होणे
तिथून कर्जतचे एक साधक श्री. विजय देशमुख त्या गाडीत बसले. अस्थीविसर्जनाच्या ठिकाणच्या मंदिराच्या नावाविषयी समन्वयाच्या अभावामुळे आमच्या दोन्ही गाड्या १५ कि.मी. पुढे गेल्या. तिथे गेल्यावर सगळा उलगडा झाला आणि यू टर्न घेऊन आम्ही सर्व १५ कि.मी मागे येऊन इच्छित स्थळी पोचलो. यामुळे उशीर झाला.
३. टाळ अन् चिपळ्या यांचा गजर ऐकू येणे आणि सूर्य अस्ताला जाणे, अशा वातावरणात अस्थीविसर्जन होणे
उशीर झाल्यामुळे असा एक चांगला योग आला की, अस्थीविसर्जन करतांना समोरच्या मंदिरातून संत तुकाराम महाराज यांचे अभंग ध्वनीवर्धकावरून ऐकू येऊ लागले. तेव्हा टाळ आणि चिपळ्या यांचा गजर होत होता अन् समोर सूर्य अस्ताला जात होता.
आई, तू निरोप घेऊन गेलीस सगळ्यांचा।
तसा आता सूर्य जात आहे अस्ताला ॥
पण तो उद्या परत उगवेल ।
आई, तू येणार नाहीस ना कधी परत ॥
या मंगलमय वातावरणात माझ्या प्रिय आईचे अस्थीविसर्जन झाले.
आपण ठरवतो एक आणि तो परमेश्वर अशी काहीतरी किमया घडवून आणतो की, त्या परमेश्वराला अन् प.पू. डॉ. जयंत आठवले यांना शतशः प्रणाम !
– श्रीमती अनुपमा देशमुख (पू. नेनेआजींची कन्या), पुणे (२७.१.२०२०)
पू. शालिनी नेनेआजी यांच्या देहत्यागानंतर त्यांचे अंत्यसंस्कार देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात झाल्यावर त्यांची मुलगी श्रीमती अनुपमा देशमुख यांनी व्यक्त केलेले विचारमाझ्या आईवरील अंत्यसंस्कार पुष्कळ चांगले झाले. माझी आई पुष्कळ भाग्यवान होती. असे फारसे कोणाच्या नशिबाला येत नाही. माझ्याबरोबर आलेली मंडळीही म्हणत होती, असे आम्ही कोणाचेच पाहिले नाही. खरेच पुष्कळ छान झाले. तिचे सोने झाले. – श्रीमती अनुपमा देशमुख (पू. नेनेआजींची मुलगी), पुणे (१८.१०.२०२०) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |