कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई – कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडले पाहिजे, असेही ते म्हणाले. ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद – संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते. पुस्तकातून नव्या पिढीला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची माहिती देण्यात आली असून महाराष्ट्राची भूमिका मांडण्यात आली आहे.
“कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच”; सीमावादावरुन उद्धव ठाकरे आक्रमक https://t.co/qvdfbuLDDD via @LoksattaLive @CMOMaharashtra @OfficeofUT #Maharashtra
— LoksattaLive (@LoksattaLive) January 27, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले,
१. सीमावादासाठी जेव्हा आंदोलन झाले, तेव्हा पुढील १० दिवस मुंबई धगधगत होती. आपल्याला तीच धग पुन्हा जागवायची आहे. हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. तुम्ही महाराष्ट्रातच आहात.
२. कर्नाटक सरकार उर्मटपणाने एकेक पाऊल टाकत आहे. एखादे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर काही करायचे नसते; कारण तो न्यायालयाचा अपमान ठरतो; पण तरीही बेळगावचे नामांतर करण्यात आले. त्याला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला. तेथे विधीमंडळाचे अधिवेशन घेतले जाते. हा न्यायालयाचा अपमान नाही का ?
३. आपण ज्याप्रकारे कायद्याचा विचार करतो, तसे कर्नाटक सरकार करत नाही. कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असले किंवा कुणीही मुख्यमंत्री असला, तरी ‘मराठी लोकांवर अत्याचार करायचा’, याविषयी त्यांचे दुमत नसते. त्याचप्रमाणे हा भूभाग जो कर्नाटकव्याप्त आहे, तो माझ्या राज्यात आणणारच. आपण एकत्रितपणे लढल्यासच हा प्रश्न सुटेल.
४. जोपर्यंत हे प्रकरण न्यायालयात आहे, तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित का केला जाऊ नये ? जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत आपल्या सरकारने हा भूभाग केंद्रशासित करण्याची मागणी न्यायालयात केली पाहिजे. कर्नाटक सरकारची मस्ती अजिबात चालू देणार नाही.