प्रजासत्ताकदिनी संगमनेर येथील ज्येष्ठ नागरिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
संगमनेर – येथील तहसील कार्यालयाच्या आवारात प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमानंतर २६ जानेवारी या दिवशी भूमीच्या वादातून अनिल शिवाजी कदम या ज्येष्ठ नागरिकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. पोलिसांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. तरी ६० टक्के भाजल्याने ते गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
अनिल कदम यांनी काही वर्षापूर्वी गणेशवाडीतील सादीक रज्जाक शेख आणि सुमय्या सादीक यांच्याशी एका जागेचा व्यवहार केला होता; पण तो व्यवहार पूर्ण होत नसल्याने त्यांच्यात वाद होता. पोलिसांनी यात हस्तक्षेप करून स्वत:च्या जागेत रहाणारे शेख कुटुंबियांना बाहेर काढावे, असे अनिल कदम यांचे म्हणणे होते. मात्र प्रकरण दिवाणी स्वरूपाचे आणि न्यायप्रविष्ट असल्याने पोलीस काही करू शकत नव्हते. कदम यांनी गेल्या वर्षीही असाच प्रयत्न केला होता; मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच कह्यात घेतल्याने दुर्घटना टळली होती.