ऊर्जामंत्री आणि राज्य सरकार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मनसेची मागणी
वाढीव वीजदेयकांविषयी जनतेची फसवणूक केल्याचे प्रकरण
मालवण – वीजदेयकांत कपात करण्याचा निर्णय लवकरच घेऊ, असे आश्वासन देऊन आता वाढीव वीजदेयकांविषयीच्या भूमिकेत पालट करणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकार यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे नोंद करा, अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी येथील पोलीस निरीक्षक शीतल पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात आलेल्या वाढीव वीजदेयकांत घट करावी, या मागणीसाठी राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही वाढीव वीजदेयकांविषयीच्या सूत्रावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. ४ दिवसांपूर्वीच थकित वीजदेयके वसुल करा. जे थकबाकी देणार नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडित करा, असा आदेश ऊर्जा विभागाने दिल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्या पार्श्वभूमीवर मालवण येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी येथील वीजवितरणच्या कार्यालयात अधिकार्यांची भेट घेऊन वीजपुरवठा खंडित करू नये, याविषयी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात २२ ते ८ जून २०२० या कालावधीत अतीकठोर दळणवळण बंदी होती. तरीही वीजवितरण कंपनीने ग्राहकांना भरमसाट वीजदेयके पाठवली. याविषयी राज्यभरात अनेक आंदोलने झाल्यावर ऊर्जामंत्री राऊत यांनी वीजदेयकांत कपात करण्याचा निर्णय लवकरच घेऊ, असे आश्वासन दिल्याचे वृत्त सर्व प्रमुख वृत्तवाहिन्या आणि दैनिके यांत प्रसिद्धही झाले होते; मात्र आता वीजदेयक भरण्याविषयी आदेश काढल्याने त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे.