सौ. लिंदा बोरकर यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची गुणसंपन्नता आणि त्यांच्या सहवासातील काही क्षणमोती !
सांप्रतकाळी बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले अशा विभूती सापडणे दुर्मिळच !
स्वतःची प्रत्येक कृती आदर्श करून साधकांना घडवणारे परात्पर गुरुदेव डॉ. आठवले हे केवळ वंदनीयच नव्हे, तर एक असामान्य अवतारी व्यक्तीमत्त्व आहे. साधकांवर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करून त्यांना आनंद देणार्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न बनवणार्या गुणनिधींचे भांडार असलेल्या अद्वितीय गुरुदेवांची महती शब्दांत वर्णन करणे अशक्यच आहे. त्यांची गुणवैशिष्ट्ये शब्दबद्ध करण्याचा साधिकेने केलेला हा प्रयत्न !
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली गुणसंपन्नता
१ अ. निरपेक्ष प्रेम (प्रीती)
१ अ १. प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे त्याला खाऊ देणे : साधारणतः वर्ष १९९२ मध्ये मी सनातनच्या संपर्कात आले आणि १९९४-९५ पासून मी अभ्यासवर्गाला अन् सत्संगाला जाऊ लागले. वर्ष १९९६ ते ९८ या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले प्रसारानिमित्त मुंबईहून गोव्याला येत असत. त्या वेळी ते गोव्यातील प्रत्येक साधकाला कोणता खाऊ आवडतो, हे लक्षात ठेवून तो घेऊन येत असत. माझ्यासाठी ते मला आवडणारे हवाबाण हरडे आणि आवळा सुपारी आणत. प्रवासातून आल्यावर विश्रांती घेण्यापूर्वीच ते प्रत्येकाला त्याचा खाऊ देत. यातून त्यांनी आम्हाला इतरांचा विचार कसा करावा ?, हे शिकवले. अजूनही एखाद्या साधकाने चांगली सेवा केल्यास, त्याचे कौतुक म्हणून ते खाऊ पाठवतात.
१ अ २. बहिणीच्या शस्त्रकर्माच्या वेळी रुग्णालयात जेवणाचा डबा पाठवण्याची व्यवस्था करणे : वर्ष १९९६ मध्ये माझ्या मोठ्या बहिणीचे मुंबईला शस्त्रकर्म झाले. त्या वेळी मी ताईसमवेत होते. परात्पर गुरुदेवांनी पहिल्या दिवसापासूनच आम्हाला डबा देण्याची व्यवस्था केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वतःकडील काही खाऊ डब्यासमवेत पाठवला. त्यानंतर रुग्णालयात आमच्या नातेवाईकांपैकी कुणी ना कुणी आम्हाला भोजनाचा डबा पाठवू लागला.
१ अ ३. वर्ष १९९७ मध्ये जाहीर सभेची सेवा करून परत आल्यावर परात्पर गुरुदेव साधकांसाठी नामजपादी उपाय करायचे.
१ अ ४. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी; म्हणून साधक करत असलेल्या स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रियेला साहाय्य करत असत.
१ अ ५. रुग्णाईत साधकांना भेटण्यास प्राधान्य देणे : त्या काळी परात्पर गुरुदेव प्रसारानिमित्त विविध राज्यांत जात असे. वर्ष २००३ मध्ये एकदा आम्ही पुण्याहून प्रसार दौरा संपवून देवद आश्रमात जात होतो. देवद येथे पोचल्यावर परात्पर गुरुदेव चारचाकीतून उतरले आणि थेट आश्रमात न जाता रुग्णाईत असलेल्या पू. फडकेआजींना भेटायला गेले. त्या वेळी त्यांनी मलाही त्यांच्या समवेत नेले होते.
या प्रसंगातून परात्पर गुरुदेवांची साधकांवर असलेली प्रीती दिसून येते. प्रीती कशी करावी ? हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतूनच साधकांना शिकवले.
१ आ. विनम्रता : परात्पर गुरुदेवांनी स्वतःच्या शैक्षणिक वा व्यावसायिक गुणवत्तेचा कधीही गाजावाजा केला नाही. त्यांनी हिप्नोथेरपी आणि अध्यात्म यांच्या साहाय्याने पुष्कळ रुग्णांना बरे केले आहे, हे त्या रुग्णांच्या रुग्णपत्रिकांवरून (केसपेपरवरून) लक्षात येते.
१ इ. स्वतःची वैयक्तिक कामे स्वतः करणे : परात्पर गुरुदेवांनी कधीही कोणत्याही साधकाला स्वतःचे ताट किंवा कपडे धुवू दिले नाहीत. ते स्वतःची कामे स्वतः करत असत.
१ ई. व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा : परात्पर गुरुदेवांनी आम्हा सर्व साधकांना भविष्यात उपयुक्त होईल, या दृष्टीने जुनी छायाचित्रे, चित्रे, वृत्तपत्रांची कात्रणे, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू कशा जतन करायच्या ?, हे शिकवले. ते आम्हाला या वस्तू खोक्यात घालून त्यावर त्या वस्तूंची नावे लिहायला सांगत, तसेच ज्या खोक्यात खाद्यपदार्थ घालून ठेवायचे, त्यावर तो पदार्थ कधीपर्यंत वापरला जायला हवा, याविषयी सूचना लिहायला सांगत.
१ उ. निरागसता : परात्पर गुरुदेव एखाद्या बालकाप्रमाणे निष्पाप आहेत. त्यांच्या मनात कुणाविषयी कसल्याही प्रकारची नकारात्मता नसते. कुणी काही सांगितल्यास ते त्यावर निःशंकपणे विश्वास ठेवतात.
१ ऊ. तत्परता : वर्ष १९९७ मध्ये एकदा माझ्या बहिणीने परात्पर गुरुदेवांना एक मोठा डबा भरून खाऊ दिला होता. परात्पर गुरुदेवांनी तत्काळ तो खाऊ मुंबई आश्रमातील साधकांसाठी घेऊन जाण्याचे ठरवले. गुरुदेव डबा घेऊन गेल्यावर ते डबा परत पाठवतील, असे तिला वाटले नव्हते; परंतु २ दिवसांनी तिला तो डबा परत मिळाला. गुरुदेवांनी त्या डब्यात मिठाई घालून त्यावर तिचे नाव लिहून तो पाठवून दिला होता.
१ ए. क्षात्रगीते गाण्याचा सराव करतांना संयमाने साधिकेला पुनःपुन्हा समजावून सांगणे : १९९८ ते १९९९ या काळात मी क्षात्रगीते गाण्याचा सराव करत असे. परात्पर गुरुदेव मला त्या गीतांत अपेक्षित भाव येण्यासाठी ती एका विशिष्ट लयीत गायला सांगत असत. गातांना माझ्या चुका झाल्यास ते मला पुनःपुन्हा समजावून सांगत; मात्र हे सांगताना ते कधीही माझ्यावर रागावले नाहीत.
१ ऐ. परेच्छेने वागणे : गुरुदेव सतत इतरांचा विचार करतात आणि त्यांच्या इच्छेनुसार वागण्याचा प्रयत्न करतात. विवाहानंतर परेच्छेने वागण्याचा सराव होण्याच्या दृष्टीने त्यांनी मला यजमानांच्या लहान सहान इच्छांनुसार वागायला सांगितले होते.
२. शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. जवळीक साधण्यास शिकवणे
२ अ १. साधकांमध्ये कुटुंबभावना निर्माण करणे : परात्पर गुरुदेवांनी आम्हा सर्व साधकांना एकमेकांशी जवळीक साधून कुटुंबभावनेने एकत्र कसे रहायचे ? ते शिकवले. १९९७ मध्ये सत्संगाच्या निमित्ताने आम्ही साधकांच्या घरी जात असू. तेथे गेल्यावर गुरुदेव आम्हाला पाहुण्यांप्रमाणे बसू देत नसत. ते आम्हाला त्या साधकाला स्वयंपाकात साहाय्य करणे, भोजन वाढणे आणि भांडी धुणे इत्यादी कामांमध्ये साहाय्य करायला सांगत. त्यामुळे ज्या साधकाच्या घरी सत्संग आहे, त्याला ताण येत नसे, तसेच सर्व साधकांच्या मनात एकमेकांविषयी जवळीक निर्माण होई. अशा प्रकारे औपचारिकता टाळून सहजपणे कसे वागायचे ? हे त्यांनी आम्हाला शिकवले.
२ अ २. वर्ष २००० मध्ये माझा विवाह ठरल्यावर त्यांनी माझ्या सर्व कुटुंबियांना दोनापावला येथे केळवणाला बोलावले होते.
२ आ. ईश्वरावर श्रद्धा ठेवण्यास शिकवणे : वर्ष १९९९ मध्ये मी सेवेसाठी दोनापावला येथे जात असे. मला सेवा संपवून घरी परतायला उशीर होत असे. त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी मी करत असलेली सेवा हे ईश्वरी कार्य असल्याने विलंब झाला, तरी देव काळजी घेणारच आहे, असे सांगून माझी श्रद्धा अधिक दृढ केली. त्यामुळे विलंबाने एकट्याने घरी येण्याविषयी मला वाटणारी भीती नष्ट झाली.
२ इ. ग्रंथांची परिपूर्णता : इंग्रजी ग्रंथांच्या मुद्रितशोधनाची सेवा परिपूर्ण कशी करायची ?, हे परात्पर गुरुदेवांनी मला शिकवले. लिखाणातील व्याकरणाची लहानशी चूकसुद्धा दुरुस्त करायला हवी, असा त्यांचा आग्रह असे. दोन शब्दांतील योग्य अंतर, प्रश्नचिन्ह वा अवतरणचिन्ह योग्य प्रकारे पहायला हवे, असे ते सांगत असत. हे सर्व करण्यामागे लिखाण सात्त्विक व्हावे आणि वाचकांपर्यंत उत्तम तेच पोचावे, असा त्यांचा हेतू असे.
२ ई. वेळेचा सदुपयोग आणि नियोजनबद्धता : परात्पर गुरुदेवांनी आम्हाला प्रत्येक क्षण साधनेसाठी कसा वापरायचा ? ते शिकवले. ते स्वतः एकही क्षण वाया घालवत नाहीत. जर अकस्मात कोणी साधक भेटायला आले; तर त्यांच्या भेटीसाठी गेलेला सेवेचा वेळ ते स्वतःच्या विश्रांतीचा वेळ न्यून करून भरून काढतात.
२ उ. आई-वडिलांचा आदर करणे : परात्पर गुरुदेवांनी आमच्या मनावर वयोवृद्ध आई-वडिलांची सेवा प्राधान्याने करणे महत्त्वाचे आहे, हे बिंबवले. आई-वडील ईश्वराचे सगुण रूप आहेत, असा भाव मनात ठेवून त्यांची सेवा करायला हवी, असे गुरुदेव सांगत असत.
२ ऊ. वस्त्र, केशरचना इत्यादी प्रत्येक गोष्ट सात्त्विक करण्यास शिकवणे : परात्पर गुरुदेव साधकांना सात्त्विक आणि असात्त्विक यांतील भेद लक्षात यावा, यासाठी ते आम्हाला विविध लेखकांची पुस्तके वाचायला सांगून त्यात काही सात्त्विक आहे का ? हे शोधायला सांगत. त्यांनी आम्हाला घरात असलेल्या लाकडी सामानाचे (फर्निचरचे) परीक्षण करायला शिकवले होते. त्या काळात माझे केस आखूड होते आणि मी ते मोकळे सोडत असे. गुरुदेव मला केस बांधायला सांगत. नंतर मोकळे सोडलेले केस असात्त्विक असून त्यामुळे त्रास होऊ शकतो, हे माझ्या लक्षात आले. गुरुदेव सात्त्विक वेषभूषा कशी करावी ? कोणते रंग सात्त्विक आहेत ?, याविषयीही सांगत असत.
२ ए. पायपोस, कागदाचे तुकडे इत्यादी व्यवस्थित ठेवण्यास शिकवणे : खोलीच्या बाहेर घातलेले पायपोस तिरके झाले असल्यास गुरुदेव स्वतः ते सरळ करत असत; कारण असा पालट केल्याने त्यातून सात्त्विक स्पंदने निर्माण होतात. एखादा वेडावाकडा कागद असल्यास गुरुदेव त्याची घडी घालून तो समांतर रेषेत कापून घेत आणि मग तो जागेवर ठेवत.
२ ऐ. आत्मविश्वास वाढवणे : माझा स्वभाव भिडस्त आणि लाजाळू होता. गुरुदेवांनी मला इतरांमध्ये मोकळेपणाने मिसळण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले. मला पुष्कळ रहदारी असलेल्या शहरातून चारचाकी चालवायला भीती वाटत असे. वर्ष १९९७ मध्ये माझी भीती घालवण्यासाठी त्यांनी मला रहदारीच्या ठिकाणी चारचाकी चालवण्यासाठी प्रोत्साहित केले.
२ उ. साधकांना दिलेली सेवा पूर्णत्वास जाण्यासाठी पाठपुरावा करणे : वर्ष २००२ मध्ये माझ्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्या वेळी गुरुदेवांनी मला आई-वडिलांसाठी आश्रमातून भेटवस्तू घेऊन जायला सांगितले. त्यांनी तात्काळ संबंधित साधकाला बोलावून त्याविषयी सांगितले. एवढेच नव्हे; तर मी घरी जाण्यापूर्वी मला ती भेटवस्तू मिळाली आहे ना ?, याचा पाठपुरावाही घेतला. अशा प्रकारे ते साधक करत असलेली प्रत्येक सेवा, साधकांना दिला जाणारा खाऊ इत्यादी गोष्टींचा पाठपुरावा घेतात.
– सौ. लिंदा बोरकर, गोवा. (मार्च २०१९)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |