‘जय श्रीराम’ म्हटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येत नाही ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना
मुंबई – कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत एका कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाषणाच्या अगोदर उपस्थित नागरिकांनी ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे ममता बॅनर्जी प्रचंड संतापल्या होत्या. या घटनेवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले, ‘‘जय श्रीराम’ ऐकायला आणि म्हणायला या देशात कुणालाही त्रास व्हायला नको. ‘जय श्रीराम’ म्हटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येत नाही. प्रभु श्रीराम हे या देशाची अस्मिता आणि आधार आहेत. ‘जय श्रीराम’ हा काही राजकीय शब्द नाही. हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. ममता बॅनर्जी याही प्रभु श्रीरामावर श्रद्धा ठेवतात, असा मला विश्वास आहे.’’
या घटनेनंतर मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष (‘प्रोटेम स्पीकर’) आमदार रामेश्वर शर्मा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे. सामाजिक प्रसारमाध्यमांवर ही माहिती देतांना शर्मा म्हणाले की, ममतादीदी रामायणाचे वाचन करतील. प्रभु श्रीरामांचे चरित्र समजतील आणि इथून पुढे ‘जय श्रीरामा’च्या घोषणेचा विरोध करणार नाहीत, अशी मी अपेक्षा करतो.