कायमस्वरूपी जागा देण्याची रवि जाधव यांची मागणी मान्य करणे शक्य नाही ! – नगराध्यक्षांचे स्पष्टीकरण

नगराध्यक्ष संजू परब

सावंतवाडी – गेले ६ दिवस नगरपरिषद कार्यालयासमोर रवि जाधव या व्यावसायिकाने व्यवसायासाठी जागा मिळावी, यासाठी उपोषण चालू ठेवले आहे. त्यांना आजच जागा हवी, अशी मागणी असेल, तर ते शक्य नाही; परंतु भविष्यात त्यांचा विचार करू; मात्र न्यायालयीन प्रक्रिया करून मिळालेली जागा जाधव यांना देणे अशक्य आहे, असे मत नगराध्यक्ष संजू परब यांनी जाधव यांच्या चालू असलेल्या उपोषणाच्या अनुषंगाने व्यक्त केले आहे.

रवि जाधव यांनी व्यवसायासाठी जागा मिळावी, यासाठी आंदोलन चालू केले आहे. याविषयी नगराध्यक्ष परब म्हणाले, सध्या दिलेल्या हंगामी स्टॉलच्या ठिकाणी कायमस्वरूपी जागा मिळावी, ही जावध यांची मागणी मान्य होणे शक्य नाही; कारण नगरपरिषदेने न्यायालयीन प्रक्रिया करून ही जागा रिक्त केली आहे. त्यामुळे न्यायालयाने निर्णय दिलेली जागा कुणालाही कायमस्वरूपी देता येऊ शकत नाही. शहरात अनेक बेरोजगार आहेत. सर्वजण गाळ्याची मागणी करतील, तर कसे शक्य आहे ? नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जाधव यांना ३ वेळा भेटले; मात्र जाधव यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. नगराध्यक्ष म्हणून परिस्थितीनुसार मीही भेट घेईन. जिल्हाधिकारी यांनी शहरातील ९ गाळ्यांवर कारवाई करण्याचे आदेश नगरपरिषद प्रशासनाला दिले आहेत; तरीही मागील अनेक वर्षे त्या ठिकाणी व्यवसाय करून उदरनिर्वाह करणार्‍या गाळेधारकांवर नगराध्यक्ष म्हणून मी उपासमारीची वेळ येऊ देणार नाही. त्यांचे नक्कीच पुनर्वसन केले जाईल.