बलसागर भारत होवो !
२६ जानेवारी २०२१ या दिवशी प्रजासत्ताकदिन आहे. यानिमित्ताने…
मी इयत्ता ४ थीमध्ये होतो, तेव्हा २६ जानेवारीला साने गुरुजींनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध अन् स्वरबद्ध केलेले बलसागर भारत होवो, हे स्फूर्तीगीत म्हणण्यासाठी माझी समूह गायनात निवड झाली. त्या वेळीच बलसागर भारत होवो, या स्फूर्तीगीताविषयी ओढ निर्माण झाली. त्या वेळेपासून मी हे गीत मध्ये मध्ये गुणगुणत असतो. ते गातांना माझ्यातील शौर्याची जागृती होऊन राष्ट्रभक्ती जागृत झाल्याचे मी अनेक वेळा अनुभवले आहे. २६ जानेवारीला भारताचा प्रजासत्ताकदिन आहे. भारतातील हिंदु युवकांच्या हृदयातील राष्ट्रीयत्व, राष्ट्राभिमान पुन्हा जागृत व्हावा आणि काळानुसार या काव्याचा अर्थबोध प्रत्येक राष्ट्रप्रेमी हिंदूला कळावा, यासाठी या गीताचा भावार्थ देवाने मला शिकवला. देशातील कोट्यवधी हिंदु युवकांना या भावार्थाने राष्ट्र कार्याची ओढ निर्माण होऊन ते भारतमातेच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे, ही गुरुचरणी प्रार्थना ! हा लेख, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व माझ्यात निर्माण करणारे राष्ट्राच्या कल्याणार्थ अविरत कार्यरत असणारे, माझ्यासाठी राष्ट्रगुरु असलेले माझे गुरु म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी अर्पण करत आहे.
हे काव्य ऐकत असतांना भगवंताला आर्ततेने प्रार्थना होते, मनाचा निश्चय आणि संकल्प देवाकडे व्यक्त होऊन राष्ट्ररक्षणार्थ शपथ घेतली जाते, असे अनुभवण्यास येते. यातील प्रत्येक शब्द देशातील हिंदु तरुणांना आवाहन करणाराही आहे, हेही या काव्यातून शिकण्यास मिळते. या गीताच्या दोन चाली प्रसिद्ध आहेत. त्यातील एक समूहगानाची चाल आणि दुसरी बाबूजी (स्व. सुधीर फडके) यांनी गायलेली चाल. यामधील बाबूजींनी गायलेल्या चालीतील हे काव्य हृदयाला अधिक भिडते आणि अंतर्मुख करते. त्या अंतर्मुखतेतून मातृभूमीला आणि भगवंताला आळवणी होऊन संकल्प होतो अन् देशाच्या युवकांना आवाहन होते, आज आपला देश संकटात आहे. पाकिस्तान, चीन, बांगलादेश आपल्या देशाचे लचके तोडण्यासाठी टपून बसले आहेत. युवकांनो, आपली मातृभूमी आज संकटात आहे. आज आपण होऊ तिचे मूल । झाली तरी चालेल मातृभूमीसाठी, आपल्या आयुष्याची चूल ॥
बलसागर भारत होवो । विश्वात शोभुनी राहो ॥
भावार्थ : हे मातृभूमीरूपी आदिशक्ती आई, शक्तीचा सागर उसळू दे, उसळलेल्या शक्ती सागराला उधाण येऊ दे आणि या बलसागराच्या भारताचे शौर्य त्रिखंडात दुमदुमु दे. हा भव्य दिव्य परंपरेचा, विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचा, पराक्रमाचा, शौर्याचा अन् बलसागराचा भारत संपूर्ण विश्वात शोभून दिसू दे.
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले ।
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायला हो ॥ १ ॥
भावार्थ : आई, तुझ्या आशीर्वादाने माझ्या मनगटामध्ये राष्ट्रसेवेचे, राष्ट्रभक्तीचे आणि राष्ट्ररक्षणाचे कंकण (कडे) मी बांधले आहे. मी त्यास्तव वचनबद्ध आहे. राष्ट्रजागृतीचे व्रत मी हाती घेतले आहे. जनसेवेसाठी आणि केवळ राष्ट्रसेवेस आता माझे जीवन समर्पित आहे. माझे प्राण माझ्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सिद्ध आहेत. प्राणार्पणाची सिद्धता करून तुला समर्पित होऊन हे मातृभूमी, हे ईश्वरा तुला प्रार्थना करतो, शक्तीचा सागर उसळू दे, उसळलेल्या शक्ती सागराला उधाण येऊ दे आणि या बलसागर भारताचे शौर्य त्रिखंडात दुमदुमुन संपूर्ण विश्वात शोभून दिसू दे.
वैभवी देश घडवीन, सर्वस्व त्यास अर्पिन ।
तिमिर घोर संहारिन, या बंंधु साहाय्याला हो ॥ २ ॥
भावार्थ : हे आदिशक्ती, तुझ्या शक्तीने या भारतभूमीचे पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. आई, हा देश तुझ्या कृपेनेच आम्ही घडवू शकू आणि त्यासाठी मी तुला माझे सर्वस्व अर्पण करत आहे. या सर्वस्वाच्या त्यागाने आणि शौर्याच्या पराक्रमाने आम्ही देशावरील तिमिररूपी संकटाचा संहार करू. हे अभूतपूर्व राष्ट्रकार्य करण्यासाठी देशातील कोट्यवधी भारतमातेच्या सुपुत्रांना मी आवाहन करतो, या बंधूंनो साहाय्याला या. मातृभूमीच्या रक्षणासाठी सिद्ध व्हा ! विश्वात शोभून दिसणारा बलसागर भारत निर्माण करण्या बंधूंनो सिद्ध व्हा !
हातात हात घालून, हृदयास हृदय जोडून ।
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायला हो ॥ ३ ॥
भावार्थ : आई, या राष्ट्रनिर्मितीसाठी जात, पात, पक्ष संघटनांच्या बेड्या तोडून टाकू, हातात हात घेऊन चालू, हृदयाला हृदये जोडू. १०० कोटी हिंदू हृदयांच्या एकसंघतेचा म्हणजेच हिंदु ऐक्याचा मंत्र जपून आज हे राष्ट्रनिर्मितीचे महत् कार्य करण्यासाठी मी देशातील तरुणांना आवाहन करतो, या बंधूंनो, राष्ट्रनिर्मितीच्या अर्थात् हिंदु राष्ट्र कार्यास समर्पित व्हा ! देशासाठी आपले योगदान द्या ! विश्वात शोभून दिसणारा आणि बलसागर भारत निर्माण करायचा आहे.
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ ।
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो ॥ ४ ॥
भावार्थ : हे हिंदु युवकांनो, आदिशक्तीच्या आशीर्वादाने हातामध्ये दिव्य पवित्र असलेली केशरी ध्वजा घेऊ. आपण शौर्याची, पराक्रमाची, राष्ट्रभक्तीची गीते गाऊ, मातृभूमीच्या रक्षणास आपुला पराक्रम विश्वात दाखवू, शौर्याने आपुली मातृभूमी त्रिखंडात गाजवू आणि आपल्या आईला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने नेऊ. वर्ष २०२३ मधील चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा जणू माझ्या आईची वाट बघते आहे. माझ्या मातृभूमीच्या मस्तकी हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्यासाठी जीव व्याकुळतो आणि तळमळतो आहे; पण हे ध्येय आता जवळ आले आहे. आता वेळ आहे, ती हिंदु युवकांच्या योगदानाची ! या शूरांनो, विरांनो विश्वात शोभून दिसणारा आणि बलसागर भारत निर्माण करायचा आहे.
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ ।
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो ॥ ५ ॥
भावार्थ : हिंदु युवकांनो उठा, आता शर्थ करूया. हिंदु राष्ट्र स्थापनेचा बिंदु संपादण्यासाठी पुरुषार्थ दाखवूया. आपल्या भारतभूमीला हिंदु राष्ट्र म्हणून सिद्ध करणे, हाच काळानुसार खरा पुरुषार्थ आहे आणि या पुरुषार्थाविना हे आयुष्य व्यर्थ आहे. हिंदु राष्ट्र कार्याविना अन् भगवंताच्या अधिष्ठानाविना आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही. हा हिंदुसूर्य, हिंदु राष्ट्राचा भाग्यसूर्य असाच तळपत राहो अन् आमुचे जीवन भगव्यासमान त्यागाचे करो, हीच आदिशक्तीला प्रार्थना !
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल ।
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो ॥ ६ ॥
भावार्थ : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेने देशातील सर्वच संकटे दूर होतील. माझी मातृभूमी संपूर्ण जगामध्ये थोर होईल. माझ्या मातृभूमीच्या शौर्याचे, पराक्रमाचे, दिव्यतेचे गोडवे संपूर्ण विश्व गायील. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेने तिचे दिव्य वैभव विश्वात शोभून दिसेल आणि माझी मातृभूमी संपूर्ण विश्वाला शांती प्रदान करील अन् विश्वकल्याण होईल, सर्वत्र आनंदी वन भुवन होईल. हे आदिशक्ती, हा सोन्याचा दिवस लवकर आम्हा लेकरांना पहाण्यास मिळो, विश्वात शोभून दिसणारा भारत लवकर निर्माण होवो, बलसागर भारत हिंदु राष्ट्राच्या रूपात लवकर स्थापन होवो, हीच तुझ्या पावन चरणी तुझ्या सुपुत्राची प्रार्थना !
हिंदु प्रजासत्ताक राष्ट्रनिर्मिती कार्यास आणि योगदान देण्यास इच्छुक सर्व हिंदु युवकांनो आजच संपर्क करा. मातृभूमी आपली वाट पहाते आहे ! हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात आजच सहभागी व्हा !
– श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती (१०.१.२०२१)