पुतिन कि नवेलनी ?
बोरिस नेम्त्सोव्ह, बोरिस बेरेझोव्स्की, सर्गेई मॅग्निट्स्की, अॅना पोलिटोस्काया, युरी श्चकोचीखिन ही रशियातील ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. यांतील काही जण व्यावसायिक, काही पत्रकार, तर काही मानवाधिकार कार्यकर्ते होते. या सर्वांचा गुन्हा एकच होता की, त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या कार्यशैलीच्या, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला. यांतील काही जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या, तर काहींवर विषप्रयोग करण्यात आला. या सूचीमध्ये अॅलेक्सी नवेलनी यांचेही नाव अंतर्भूत झाले असते; मात्र दैव बलवत्तर म्हणून ते वाचले. नवेलनी हे पुतिन यांचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जातात.
ऑगस्ट २०२० मध्ये विमानातून प्रवास करतांना त्यांनी मागवलेल्या चहाद्वारे त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. याआधीही त्यांच्यावर प्राणघातक आक्रमणे झाली आहेत, तसेच त्यांना काही काळ कारागृहातही धाडण्यात आले; मात्र पुतिन यांची एकाधिकारशाही, त्यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर काढण्याची त्यांची खुमखुमी थोडीही अल्प झालेली नाही. विषप्रयोगानंतर त्यांच्यावर जिवावर बेतले असतांना त्यांना जर्मनीत हालवण्यात आले. त्यांचे आरोग्य सुधारल्यावर नवेलनी अटक टाळण्यासाठी किंवा जिवाच्या भीतीने विदेशात रहातील, असा कयास बांधला जात असतांना त्यांनी परत रशियात जाण्याचा निश्चय केला. ते रशियाच्या विमानतळावर उतरल्यावर त्यांना अटक करण्यात आली. नवेलनी हे अमेरिकेसाठी काम करतात, असे रशिया सरकारचे म्हणणे आहे. त्यांच्या अटकेने रशियात रान पेटले आहे. त्यांच्या समर्थनार्थ आणि पुतिन यांच्या विरोधात लाखो लोक मॉस्कोच्या रस्त्यांवर उतरले. तसेच हे लोण देशातील १०० शहरांमध्ये पसरले आहे. रशियात कडाक्याची थंडी असतांनाही लोक रस्त्यांवर उतरून नवेलनी यांच्या समर्थनार्थ बाहेर पडत आहेत. रशियातील हा राजकीय संघर्ष पेटणार असून जगाचे त्याकडे लक्ष लागले आहे.
पुतिन का नको ?
पुतिन यांना रशियाच्या सत्तेची सूत्रे हाती घेऊन २२ वर्षे उलटली आहेत. त्यांनी रशियाच्या घटनेत फेरफार केल्याने ते पूर्ण हयात देशाची सत्ता उपभोगू शकतात. सोव्हिएत रशियाची शकले उडाली आणि रशियाचे महाशक्ती म्हणून मिरवणे थांबले. पुतिन यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी पुन्हा अमेरिकेशी दोन हात करण्यास आरंभ केला. रशियाशी फुटून बाहेर पडलेला युक्रेन परत रशियाच्या छत्रछायेखाली येण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पुतिन यांचे राजकारण हे राष्ट्रवादावर अवलंबून आहे. पुतिन देशाला पुनर्वैभव परत मिळवून देतील, असा लोकांचा समज आहे. त्यामुळे अजूनही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार्या लोकांची संख्याही अधिक आहे; मात्र जसजसा पुतिन आणि त्यांचे सरकार यांचा भ्रष्टाचार बाहेर पडला, लोकांचा त्यांच्या विरोधातील रोष वाढू लागला. जागतिक राजकारणाचा आढावा घेतल्यास प्रत्येक देशातील नागरिक हे अलीकडच्या काळात राष्ट्रवादाला प्राधान्य देतांना दिसतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रवादाच्या सूत्रावर निवडून आले; मात्र केवळ राष्ट्रवाद पुरेसा नसतो. जनतेला शासनकर्ते हे लोकनेते म्हणून हवे असतात. राष्ट्रवादासह स्वच्छ प्रतिमा असणारे, लोकाभिमुख आणि जनहित साधणारे शासनकर्ते जनतेला अपेक्षित असतात. पुतिन येथेच अल्प पडले. राष्ट्राध्यक्षपदावर आरूढ झाल्यावर त्यांनी बरीच माया कमावल्याचे उघडपणे बोलले जाते. नवेलनी यांनी काही दिवसांपूर्वी यू ट्यूबवर लोकांना पुतिन महालाचे दर्शन घडवले. ब्लॅक सीच्या किनार्यावर उभारलेला हा महाल अब्जावधी रुपये खर्च करून बांधला असून त्यासाठी पुतिन यांना देशातील अब्जाधिशांनी पैसे पुरवल्याचे म्हटले जाते. हा व्हिडिओ रशियात चांगलाच गाजला. नवेलनी अशा प्रकारे भ्रष्टाचार बाहेर काढत असल्यामुळे पुतिन यांना नको आहेत. वर्ष २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी पुतिन यांनी थेट नवेलनी यांना निवडणूक लढवण्यास मज्जाव केला. पुतिन यांची हीच एकाधिकारशाही लोकांना नकोशी झाली आहे. पूर्वी पुतिन यांच्या विरोधात केवळ लोक कुजबुजत होते. आता लोक रस्त्यावर उतरले आहेत. लोकांचे हे देशव्यापी आंदोलन पुतिन दडपण्यात यशस्वी ठरतात कि लोकांचा विजय होतो, हे येणारा काळच सांगेल. एक मात्र खरे की, एकांगी नेतृत्व अधिक काळ देशाचे नेतृत्व करू शकत नाही. थोडक्यात केवळ राष्ट्रवादी आहे; म्हणून लोक सदासर्वकाळ एखाद्या नेत्याच्या मागे उभे रहातील किंवा एखादा नेता सदाचारी आहे; म्हणून तो देशाचे चांगले नेतृत्व करू शकेल, असे होऊ शकत नाही. इतिहास तर हेच सांगतो.
भारतीय राजकारण्यांनीही धडा घ्यावा !
राष्ट्रोत्कर्षासाठी सदाचारी, कर्तव्यदक्ष, तत्त्वनिष्ठ आणि राष्ट्रहित जपणारा नेता जनतेला हवा असतो. निवडणुकीच्या आधी उमेदवार विविध प्रकारची आश्वासने जनतेला देत असतात; मात्र निवडून आल्यानंतर राजकारण्यांना याचा विसर पडतो. त्यानंतर पुढे अनेक वर्षे हे राजकारणी जनहित विसरून स्वहित साधतात. असे स्वार्थांध राजकारणी जनतेच्या समस्यांकडे कानाडोळा करतात. जनता हे सर्व पहात असते. काही काळ सहन केल्यानंतर लोकांचा उद्रेक होतोच. हेच रशियात पहायला मिळत आहे आणि त्याचा शेजारी देश असलेल्या युक्रेनमध्येही हेच पहायला मिळाले. युक्रेनमधील लोक सत्ताधारी नेत्यांच्या भ्रष्टाचाराला इतके कंटाळले की, त्यांनी राजकारणातील बाराखडीही ठाऊक नसलेले वोलोडिमिर जेलेंस्की या विनोदी अभिनेत्याच्या हाती देशाची सूत्रे देत त्यांना राष्ट्रपतीपदावर आरूढ केले. इतिहासाची पाने चाळल्यास लोकशक्ती नेहमीच प्रबळ राहिली असून तिने भल्याभल्यांना पाणी पाजले आहे.
रशिया हा पूर्वी साम्यवादी देश. त्याची शकले उडाल्यानंतर वर्ष १९९३ मध्ये त्याने लोकशाही अंगीकारली; मात्र तरीही ती नावापुरती आहे, असेच जगभरातील राजकीय धुरिणींना वाटते. साम्यवाद म्हटला की, एकाधिकारशाही आलीच. चीनमध्येही ती आहे आणि रशियातही ती दिसून येते. रशियातील झारशाही तेथील जनतेने उलथवून टाकली. आता पुन्हा तेथे इतिहासाची पुनरावृत्ती होणार का ? तेथील जनक्षोभ लक्षात घेऊन पुतिन नरमाईची भूमिका घेतात कि दडपशाही अवलंबतात, हे पहावे लागेल. एक मात्र खरे की, परिपूर्ण नेतृत्व असणारी व्यक्तीच जगाचे किंवा राष्ट्राचे नेतृत्व करू शकते. धर्माधिष्ठित व्यक्तीच परिपूर्ण असते, हेही तितकेच खरे !