शिधापत्रिकेला आधार कार्ड जोडले नसल्यास १ फेब्रुवारीपासून होणार रेशन बंद !
सातारा – केंद्रशासनाच्या आदेशानुसार शिधापत्रिकेवर धान्याचा लाभ घेणार्या सर्व कार्डधारकांना स्वत:चा आधार क्रमांक जोडून (लिंक) घेणे आवश्यक आहे. शिधापत्रिकेला आधार कार्ड क्रमांक जोडला (लिंक) नसल्यास १ फेब्रुवारीपासून रेशन बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते आणि तहसीलदार आशा होळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि अंत्योदय अन्न योजनेची शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे भ्रमणभाष क्रमांक आणि आधार क्रमांक १०० टक्के जोडण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब लाभार्थी ५ लाख ५० सहस्र आणि पिवळे शिधापत्रिकाधारक अंत्योदय ११ सहस्र लाभार्थी आहेत. यापैकी ज्यांचे आधारकार्ड शिधापत्रिकेला जोडण्याचे राहिले असेल, त्यांनी ते पूर्ण करून घ्यावे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. यासाठी ३१ जानेवारीपूर्वी सर्व शिधापत्रिकाधारकांनी १०० टक्के आधार कार्ड जोडणी करणे आणि वैध भ्रमणभाष क्रमांक जोडणे आवश्यक आहे.