गोवा विधानसभेचे आजपासून हिवाळी अधिवेशन : पहिल्या दिवशी राज्यपाल संबोधित करणार
पणजी, २४ जानेवारी (वार्ता.) – गोवा विधानसभेच्या ४ दिवसीय हिवाळी अधिवेशनाला २५ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. चालू वर्षातील हे पहिले अधिवेशन असल्याने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सदस्यांना संबोधित करणार आहेत. हे अधिवेशन २५ ते २९ जानेवारी या कालावधीत होणार आहे, तर २६ जानेवारी या दिवशी सार्वजनिक सुटी असल्याने अधिवेशन नसेल. राज्यपालांच्या संबोधनानंतर अधिवेशन काळात राज्यपालांच्या अभिभाषणावरील ठरावावर सदस्य बोलणार आहेत. या अधिवेशन काळात ७५१ प्रश्न मांडण्यात येणार आहेत. यामधील १९५ प्रश्न हे तारांकित आहेत, तर उर्वरित ५५६ प्रश्न हे अतारांकित आहेत. अधिवेशनात ५ खासगी ठराव, ४ खासगी आणि ६ शासकीय विधेयके मांडली जाणार आहेत.
अधिवेशन काळात कोरोना महामारीसंबंधी सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन करणार
कोरोना महामारीसंबंधी सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून हे अधिवेशन भरवले जाणार आहे. या काळात विद्यार्थ्यांसह अन्य प्रेक्षकांनाही सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही. अधिवेशनाचे वार्तांकन करणार्या पत्रकारांसाठी सामाजिक अंतर पाळले जावे; म्हणून त्यांना २ दालनांमध्ये बसवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभा संकुलात मास्क वापरणे बंधनकारक आहे, तसेच ‘सॅनिटायझर’ही पुरवला जाणार आहे.