व्हॅलेंटाईन डे’ मुळे समाजाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम ! – ‘१४ फेब्रुवारी अँड बियाँड’ चित्रपटाचे दिग्दर्शक उत्पल कलाल
चित्रपट क्षेत्रात ‘व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम, संस्कृतचे महत्त्व, ३७० कलम जम्मू-काश्मीरमधून हटवल्याचे लाभ, तीन तलाकचे दुष्परिणाम आदी गोष्टींविषयी प्रबोधन करणार्या चित्रपटांची निर्मिती झाली, हे कौतुकास्पद आहे.
पणजी, २४ जानेवारी (वार्ता.) – ‘व्हॅलेंटाईन डे’ मुळे सामाजाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’चे खूप मोठ्या प्रमाणात व्यावसायीकरण झालेले आहे. या व्यावसायीकरणाकडे ‘१४ फेब्रुवारी अँड बियाँड’ हा चित्रपट लक्ष वेधतो, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक उत्पल कलाल यांनी ५१ व्या ‘आंचिम’मध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.
दिग्दर्शक उत्पल कलाल पुढे म्हणाले, ‘‘१४ फेब्रुवारी अँड बियाँड’ या चित्रपटाचा प्रेम साजरे करण्यास विरोध नाही; मात्र बहुराष्ट्रीय आस्थापनांनी कशा प्रकारे त्यांच्या लाभासाठी मानवी भावनांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न चालवला आहे, याचे चित्रपटात दर्शन घडते. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा दिवस वास्तविक प्रेमाने ओतप्रोत भरलेला असायला हवा होता; मात्र त्याचे रूपांतर मानवनिर्मित आपत्तीमध्ये आणि खूप मोठ्या गोंधळात झाले आहे. याविषयी जागृती करण्याचे कार्य हा चित्रपट करत आहे.’’