श्री शिवाजी विद्यापिठाच्या उपकेंद्रासाठी ७८ गुंठे भूमीची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
सातारा, २३ जानेवारी (वार्ता.) – राज्यसभा खा.छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे श्री शिवाजी विद्यापिठाचे उपकेंद्र होण्यासाठी खावली येथील ७८ गुंठे जमीन वर्ग करण्याविषयी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे आग्रहाची मागणी केली.
या वेळी श्री शिवाजी विद्यापिठाचे सिनेट प्रतिनिधी अमित कुलकर्णी, नगरसेवक दत्ता बनकर, काका धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
खा. छ. उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, विद्यापिठाने खावली येथील उपकेंद्रास तत्त्वत: मान्यता दिली आहे. संबंधित भूमीची आम्ही आणि तत्कालीन कुलगुरु यांनी पहाणी केली आहे. उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध झाल्यास पहिल्यांदाच श्री शिवाजी विद्यापिठाचे उपकेंद्र आणि नंतर स्वतंत्र सातारा विद्यापीठ निर्माण होईल. तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची चांगली संधी प्राप्त होईल. सिंचन विभागासाठीही जागा महत्त्वाची आहे; मात्र त्यासाठी वेगळा पर्याय शोधू शकतो. खावली येथील जागा ही विद्यापीठ उपकेंद्रासाठी तातडीने उपलब्ध द्यावी.