बिडकीन (जिल्हा संभाजीनगर) येथील ग्रामसेवक संजय शिंदे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी ३ जण निलंबित
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांची कारवाई
संभाजीनगर – बिडकीन येथील ग्रामसेवक संजय शिंदे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी ‘ग्रामसेवक युनियन’चे अध्यक्ष सखाराम दिवटे, विस्ताराधिकारी भास्कर साळवे आणि चितेगावचे ग्रामसेवक तुळशीराम पोतदार यांना निलंबित केले आहे. गोंदावले यांनी यापूर्वीच पैठण येथील गटविकास अधिकारी विजय लोंढे यांचा पदभार काढून घेतला आहे.
बिडकीन ग्रामपंचायतीची पडताळणी करत असतांना मानसिक त्रास देत ५ लाख रुपयांची मागणी केल्याने ग्रामसेवक संजय शिंदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांची पत्नी प्रतिभा शिंदे यांनी केला होता. त्यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात याची तक्रार केली होती. विजय लोंढे, सखाराम दिवटे, भास्कर साळवे आणि तुळशीराम पोतदार यांच्यावर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी राज्य ग्रामसेवक युनियनने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
‘संपूर्ण प्रकरणाची चौकशी पुढील ८ दिवसांत पूर्ण करून त्याचा अहवाल सिद्ध करण्यात येईल. हा अहवाल ग्रामविकास विभागाच्या सचिवाकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. ग्रामविकास विभागाकडून या प्रकरणी विचारणा झाली आहे’, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कवडे यांनी सांगितले.