‘स्कूल गेम्स फेडरेशन’ची बनावट बँक खाती उघडून विविध राज्यांतील क्रीडा विभागांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !
माजी महासचिवाचे कारस्थान
संभाजीनगर – युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला चालना देण्याच्या नावाखाली ‘स्कूल गेम्स ऑफ फेडरेशन’ने (एस्.जी.एफ्.आय) केंद्रीय क्रीडा मंत्रालयासह देशातील विविध राज्यांच्या क्रीडा विभागांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. फेडरेशनचे माजी महासचिव राजेश मिश्रा यांनी बनावट ‘पॅन कार्ड’ आणि बँक खाते क्रमांक यांद्वारे ही फसवणूक केली आहे. यात महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाची ८६ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ‘स्कूल गेम्स फेडरशेन’च्या वतीने प्रतीवर्षी शालेय स्पर्धा भरवल्या जातात.
१. एस्.जी.एफ्.आयची वर्ष २००९ मध्ये धार्मिक संस्था म्हणून आग्रा येथे नोंदणी झालेली आहे; मात्र याच फेडरेशनच्या खात्यावर कोट्यवधी रुपयांच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार झालेले आहेत.
२. यामध्ये केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मिळालेल्या लाखो रुपयांच्या निधींचा समावेश आहे. धार्मिक संस्था म्हणून नोंदणी असतांना कोट्यवधींचे व्यवहार झाले असून या घोटाळ्याविषयी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआयकडे) तक्रार करण्यात आली.
३. फसवणूक झालेल्यांमध्ये महाराष्ट्र, देहली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुुजरात राज्यांच्या क्रीडा विभागांचा समावेश आहे.
४. याविषयी एस्.जी.एफ्.आयचे अध्यक्ष सुशील कुमार म्हणाले की, माजी महासचिव राजेश मिश्रा यांनी दुसरे बँक खाते काढल्याची आम्हाला माहिती नाही; मात्र राजेश मिश्रा यांनी त्यांचे कुटुंबीय, मेहुणा आणि मेहुण्याची सून यांच्या साहाय्याने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे.