लहानपणापासून देशभक्तीच्या विचारांत रमणारा आणि देशाला अत्युच्च स्थानी नेण्याचे ध्येय असलेला कु. जयेश !
(‘वर्ष २०१६ मध्ये कु. जयेशची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के होती.’ – संकलक)
१. जयेशमध्ये उपजत असलेली देशभक्ती !
१ अ. ऐतिहासिक, क्रांतीकारक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गोष्टी ऐकायला आवडणे
‘जयेशला लहानपणी रात्री गोष्ट ऐकल्याविना झोपच लागायची नाही. बर्याचदा सेवेमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे मला प्रत्येक वेळी त्याला गोष्ट सांगायला जमायचे नाही. त्याला ऐतिहासिक, क्रांतीकारक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गोष्टी ऐकायला फार आवडायच्या.
१ आ. प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची क्रांतीकारकांवरील व्याख्याने आणि कीर्तने ऐकणे
त्याची ही आवड लक्षात घेऊन मी त्याला प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची क्रांतीकारकांवरील व्याख्याने आणि कीर्तने भ्रमणभाषमध्ये घालून दिली. तो ती रात्री झोपतांना ऐकायचा. त्याला ती कीर्तने फार आवडायची. तो ती घंटोन् घंटे ऐकायचा. लहान असतांना त्याने त्यांची बरीच कीर्तने पाठ केली होती. बर्याच वेळा तो मला ती म्हणून दाखवायचा. कधी कधी त्यांतील चांगला भाग तो मला ऐकायलाही लावायचा.
१ इ. वाचनाची आवड निर्माण होणे आणि क्रांतीकारक अन् ऐतिहासिक युद्धे यांवरील अनेक पुस्तके वाचणे
१ इ १. जयेशने केलेल्या वाचनामुळे शाळेत खरा इतिहास शिकवला जात नसल्याचे त्याच्या लक्षात येणे : त्यातूनच त्याला वाचनाची गोडी लागली. त्यामुळे त्याला आपला खरा इतिहास कळू लागला. मराठ्यांचा आणि पेशव्यांचा बराचसा इतिहास त्याला वाचनातूनच ठाऊक झाला; कारण सध्या शाळेतून खरा इतिहास शिकवलाच जात नाही ! तो मला बर्याचदा म्हणायचा, ‘‘आई, आम्हाला शाळेतून सुलतान आणि ब्रिटीश यांचाच इतिहास शिकवला जातो. आपला खरा इतिहास मला वीर सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातूनच कळला.’’ त्या लहान वयामध्ये त्याच्या लक्षात आलेली एक गोष्ट त्याने मला सांगितली. तो मला म्हणाला, ‘‘सहा सोनेरी पाने’ हे पुस्तक मी वाचले. तेव्हा ‘हिंदूंचा पराक्रमी इतिहास आम्हाला शिकवलाच जात नाही’, हे माझ्या लक्षात आले.’’ ‘आपले शासन आपला खरा इतिहास कसा लपवून ठेवते आणि मुसलमानांचाच इतिहास कसा शिकवते ?’, हे त्याने मला समजावून सांगितले. त्याने मला सांगितलेली एक गोष्ट मी येथे दिली आहे.
जयेशला इयत्ता ७ वीच्या इतिहासाच्या पुस्तकात ‘द देहली सुलतान’ नावाचा धडा होता. त्यामध्ये देहलीवर राज्य केलेल्या सर्व सुलतानांच्या कारकिर्दींची सूची होती; पण त्यातून एका महत्त्वाच्या व्यक्तीचे नाव वगळले होते. अल्लाउद्दीनच्या राजवटीत गुजरातमध्ये काही मुसलमान सरदारांनी एका हिंदु मुलाला पकडून त्याला मुसलमान केले आणि त्याला गुलाम म्हणून अल्लाउद्दीनच्या सेवेत सादर केले. त्यांनी त्याचे नाव ‘हसन’ असे ठेवले. अल्लाउद्दीन मेल्यानंतर मलिक काफूर हा राज्यप्रमुख झाला. हसनने सुलतान मुबारिकचा (अल्लाउद्दीनचा मुलगा) विश्वास संपादन करून वजीरपद मिळवले. मुबारिकने हिंदु राजकन्या देवलदेवीशी विवाह केला होता. खुश्रूखानला (हसनला पुढे मिळालेली ही पदवी) आपण हिंदु असल्याची जाणीव होती; म्हणून त्याने देवलदेवीच्या समवेत कारस्थान करून खिलजीच्या साम्राज्यावर स्वतःचे आधिपत्य स्थापन केले. त्यानंतर त्याने पुन्हा हिंदु धर्म स्वीकारला. पुढे त्याने एक वर्षभर हिंदु राजा म्हणून देहलीवर राज्य केले. अशा हिंदु धर्मरक्षक असलेल्या नासिरुद्दिनचा (हसनचा) इतिहास पाठ्यपुस्तकात दिलेलाच नव्हता.
१ इ २. जयेशने वाचलेली देशभक्तीपर पुस्तके : जयेशला वाचनाची पुष्कळ आवड आहे. त्याने आतापर्यंत अनेक पुस्तके वाचली आहेत. ‘माझी जन्मठेप,’ ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’, ‘सहा सोनेरी पाने’, ‘द्वितीय महायुद्ध’, ‘श्रीमान योगी’, नेपोलियनच्या जीवनावरील ‘दिग्विजय’, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर लिहिलेले ‘महानायक’, ‘राऊ’, ‘झुंज’; ‘अमृतगामी संभाजी’, नानासाहेब पेशवे यांच्यावरील ‘उजळल्या प्रभा दश दिशा’, ‘एक होता कार्व्हर’, ‘पानिपत’, सावरकरांनी अनुवादित केलेले ‘जोसेफ मॅझिनी’, ‘मृत्यूंजयाचा आत्मयज्ञ’ अशी बरीच पुस्तके त्याने वाचली आहेत.
१ इ ३. प्रत्येक पुस्तक न्यूनतम ५ – ६ वेळा वाचणे आणि त्यातून शिकायला मिळालेली सूत्रे लिहून ठेवणे : त्या पुस्तकांतून ‘काय शिकायला मिळाले ?’ हेही जयेशने लिहून ठेवले आहे. तो एक पुस्तक न्यूनतम ५ – ६ वेळा वाचतो. ‘१९७१ चे अभिमन्यू’ हे वर्ष १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांवर प्रा. सु. ग. शेवडे यांनी लिहिलेले पुस्तक त्याने १५ वेळा वाचले. तो प्रतिदिन न्यूनतम १ – २ घंटे पुस्तक वाचल्याविना झोपत नाही. एकदा वाचलेले पुस्तक तो वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पुन्हा वाचतो. तो म्हणतो, ‘‘मी तेच पुस्तक पुन्हा वेगवेगळ्या दृष्टकोनातून वाचतो. त्या प्रत्येक वेळी मला त्यातून नवीन दृष्टीकोन शिकायला मिळतो.’’
१ इ ४. वाचलेल्या पुस्तकातील सूत्रांवर चिंतन करणे : तो केवळ वाचत नाही, तर एकांतात त्याचे त्याविषयी चिंतनही चालू असते. एकदा तो असाच काहीतरी विचार करत बसला होता. तेव्हा मी त्याला सहज विचारले, ‘‘कसला विचार करत आहेस ?’’ तेव्हा त्याने मला सांगितले, ‘‘मी जी पुस्तके वाचली आहेत किंवा मी जे पुस्तक वाचत असतो, त्यातील मजकूर मला माझ्या डोळ्यांसमोर दिसतो. त्याचे मी चिंतन करतो.’’
१ इ ५. जिज्ञासू वृत्तीने प्रश्न विचारणे : तो ‘साम्यवाद म्हणजे काय ? साम्राज्यवाद म्हणजे काय ?’, यांसारखे पुष्कळ सारे प्रश्न विचारून त्याविषयी माहिती जिज्ञासूपणे जाणून घेतो. बर्याचदा तो माझ्याशी इतिहासाविषयीच गप्पा मारतो.
१ इ ६. वाचलेल्या पुस्तकातील माहिती आईला बारीकसारीक तपशीलासह सांगणे : जयेश जे वाचतो, ते त्याला कुणाला तरी सांगायला किंवा त्याविषयी कुणाशीतरी बोलायला फार आवडते. त्याने जे वाचन केले आहे, त्याविषयी तो माझ्याशी बोलतो.
अ. त्याचे ‘पानिपत’ हे पुस्तक वाचून झाले. तेव्हा ‘पानिपतची लढाई जेथे झाली, तेथील नकाशा, ‘मराठ्यांची छावणी कुठे होती आणि अब्दालीची छावणी कुठे होती ? दोन्ही पक्षांची रणनीती कशी होती ?’ इत्यादी सर्व माहिती त्याने मला बारीकसारीक गोष्टींसह समजावून सांगितली.
आ. स्वा. सावरकरांच्या पुस्तकांनी तर तो फारच प्रभावित झाला. ‘सावरकर कसे द्रष्टे होते ?’, हे त्याने मला समजावून सांगितले. ‘सावरकरांचे ‘उज्जैयिनी’ ही राजधानी करण्याविषयी मत होते आणि ते राष्ट्राच्या संरक्षणाच्या अन् इतरही दृष्टीने योग्य आणि राष्ट्रहितार्थ कसे होते ?’, हे त्याने मला जगाच्या नकाशावर दाखवून सविस्तर समजावून सांगितले.
इ. ‘द्वितीय महायुद्ध’ हे पुस्तक त्याने एकदाच वाचले; पण त्यातील सर्व व्यक्तींची नावे, त्यांची पदे, हे सर्व त्याच्या लक्षात होते. ‘ते युद्ध कुठल्या कुठल्या राष्ट्रांमध्ये झाले ? मित्र राष्ट्रे कोण होती ? युद्धाचा आरंभ कसा झाला ?’, याविषयी तो मला सविस्तर माहिती सांगायचा.’
१ ई. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी पुष्कळ आदर असणे
‘जयेशला शिवाजी महाराज यांच्याविषयी पुष्कळ आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचे आराध्य दैवत आहे. तो नेहमी सुटीत पुण्याला गेल्यावर त्याच्या बाबांना एखाद्या तरी गडावर घेऊन जाण्याचा हट्ट करतो. एकदा आम्ही सज्जनगडावर गेलो होतो. तिथे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा घेतली. त्याने ती प्रतिमा आम्ही रहात असलेल्या खोलीतील देवघरात ठेवली. शिवजयंतीच्या आदल्या रात्रीच तो आजीला थोडी अधिक फुले आणायला सांगायचा आणि सकाळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून, हार घालून आणि आरती करून मगच तो शाळेत जायचा.
१ उ. देशभक्त जयेशला सैन्यात जायची इच्छा असणे, त्यासाठी त्याने व्यायाम करणे, पोहायला शिकणे आणि कराटे शिकायला जाणे
जयेशची लहानपणापासून सैन्यात जायची इच्छा आहे. त्याला ‘पायलट’ व्हायचे आहे. सैन्यात जाण्याच्या दृष्टीने तो नियमित व्यायामही करत आहे. तो पोहायला शिकला आहे आणि आता तो कराटे शिकण्यासाठी जात होता; पण दळणवळण बंदीमुळे सध्या ते बंद आहे. माझ्यातील भावनाशीलतेमुळे मी त्याला सैन्यात जाण्यापासून परावृत्त करू पहाते; पण अजूनही तो त्याच्या निर्णयावर ठाम आहे.
१ ऊ. ‘व्यावसायिक ‘पायलट’ हो’, असे मित्राने सांगितल्यावर ‘मला माझ्या देशासाठी लढण्यासाठी ‘पायलट’ व्हायचे आहे’, असे सांगणे
त्याने त्याच्या शाळेतील मित्राला ‘मला ‘पायलट’ व्हायचे आहे’, असे सांगितले. तो मित्र त्याला म्हणाला, ‘‘व्यावसायिक ‘पायलट’ हो. त्यांना भरपूर वेतन असते.’’ जयेश त्याला म्हणाला, ‘‘मला पैसे कमवायचे नाहीत. मला माझ्या देशासाठी लढायचे आहे आणि त्यासाठी मला ‘पायलट’ व्हायचे आहे.’’
२. एका अन्य पंथीय मुलाने हिंदु देवतांविषयी अयोग्य शब्द वापरल्यावर जयेशने त्याला कडक शब्दांत समज देणे
जयेशला अयोग्य गोष्टींची फार चीड आहे. तो कराटे शिकायला जातो, तेथे एक अन्य पंथीय मुलगा त्याला विनाकारण त्रास द्यायचा. एकदा तो जयेशशी अयोग्य शब्दांमध्ये बोलला. नंतर त्या मुलाने हिंदु देवतांविषयी अयोग्य शब्द वापरले. जयेशने त्याला असे न करण्याविषयी सांगितले, तरी तो मुलगा ऐकत नव्हता. तेव्हा जयेशला फार राग आला आणि त्याने त्या मुलाला कडक शब्दांत समज दिली. त्यानंतर ४ दिवस तो मुलगा शिकवणीला आला नाही. प्रत्यक्षात ती शिकवणी जिथे आहे, तिथे त्या पंथियांचीच वस्ती आहे. तेथेच बाजूला त्यांचे प्रार्थनास्थळही आहे; पण जयेशला त्याची मुळीच भीती वाटली नाही. त्याने मला एक मासानंतर हा प्रसंग सांगितला. तोपर्यंत तो तिथे प्रतिदिन शिकवणीला जायचा.
३. शाळेतही चांगली प्रगती करणे
अ. जयेश ८ वर्षांचा असल्यापासून आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहात आहोत. जयेश आश्रमाच्या जवळच असलेल्या ‘श्री सरस्वती हायस्कूल’ या शाळेमध्ये शिकत आहे. शाळेतही त्याला विविध क्रीडा स्पर्धा, कथाकथन, श्लोकपठण यांत सहभागी व्हायला आवडते.
आ. कधी शाळेत त्याच्या शिक्षिकांना भेटायला गेल्यावर त्या सांगतात, ‘‘जयेश फार गुणी आणि शांत मुलगा आहे. बर्याचदा ‘तास’ होणार नसेल (ऑफ पिरीयडला), तर इतर मुले दंगामस्ती करतात; मात्र जयेश पुस्तक वाचत असतो. तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका. तो अभ्यासातही हुशार आहे. तो फार अभ्यास करत नाही, तरी त्याला परीक्षेत चांगले गुण मिळतात.’’
इ. एकदा त्याच्या विज्ञानाच्या शिक्षकांनी सांगितले, ‘‘जयेशने विज्ञानाच्या पेपरमध्ये चांगली उत्तरे लिहिली आहेत. त्याने ती समजून घेऊन स्वतःच्या भाषेत लिहिली आहेत. इतर मुलांची उत्तरे पाठ केल्यासारखी आहेत.’’
४. संगीताची आवड
जयेशला संगीताची पुष्कळ आवड आहे. प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची संगीत नाटके तो आवडीने ऐकतो. सध्या तो तबला शिकत आहे. त्याने गंधर्व महाविद्यालयाच्या ३ परीक्षा दिल्या आहेत.
५. आजी-आजोबांची काळजी घेणे
मी दिवसभर सेवेत असते. तेव्हा खोलीत तो आणि आजी-आजोबा (माझे आई-बाबा) असतात. तो त्यांची काळजी घेतो. तो त्यांना काही ‘हवे-नको’ ते पहातो. माझ्या बाबांची प्रकृती ठीक नसते. तो त्यांना सांभाळून घेतो.
– सौ. भक्ती कापशीकर (आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘स्वतःला मातृभूमीसाठी लढतांना वीरमरण यावे’, असे वाटणेजयेशला देशभक्तीपर चित्रपट पहायला आवडतात. एकदा सुटीत घरी गेल्यावर त्याने ‘केसरी’ हा चित्रपट पाहिला. त्यात मुख्य सैनिकाला लढतांना वीरमरण येते. तो चित्रपट पाहिल्यावर बर्याच वेळा तो मला म्हणायचा, ‘‘आई, मलाही असेच माझ्या मातृभूमीसाठी लढतांना वीरमरण आले, तर किती चांगले होईल !’’ जयेशला देशाप्रती पुष्कळ प्रेम असून राष्ट्रासाठी पुष्कळ काही करण्याची त्याची इच्छा आहे. – सौ. भक्ती कापशीकर |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |