नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीच्या गोपनीय धारिकांमधील तपशील सरकारने घोषित करावा ! – भारत रक्ष मंचची ओडिशा सरकारकडे मागणी

अशी मागणी का करावी लागते ? राष्ट्राच्या एका महत्त्वाच्या घडामोडीशी निगडित ही माहिती बिजू जनता दलाने स्वतःहून उघड करणे आवश्यक आहे !

भुवनेश्‍वर (ओडिशा) – ओडिशा सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी गुप्त धारिकांचा (फाइल्सचा) ठेवलेला तपशील घोषित करावा. मंचाकडून वर्ष २०१६ मध्येही ही मागणी करण्यात आली होती; मात्र सरकारने त्याकडे कानाडोळा केला, असे भारत रक्षा मंचचे ओडिशा शाखेचे अध्यक्ष डॉ. अशोक आचार्य यांनी ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

१. मंचचे अंजनकुमार देबता यांनी सरकारने आझाद हिंद सेनेत सहभागी झालेल्या १ सहस्र  ५०० ओडिशा येथील नागरिकांची नावे घोषित करावीत. त्यांपैकी अनेकांनी त्यांच्या प्राणांचे बलीदान दिले आहे. त्यांचे योग्य ते स्मारक उभारले पाहिजे आणि नेताजींच्या नेतृत्वाखाली सैन्यात सेवा बजावणार्‍या या नागरिकांची नावे त्यावर कोरली गेली पाहिजेत, अशी मागणी केली.

२. मंचच्या महिला मोर्चाच्या आणि सॅट बार असोसिएशनच्या अध्यक्षा संगमित्रा राजगुरु यांनी नेताजी बोस ज्या शाळेत शिकत होते, त्या शाळेची पडझड झाली आहे. त्याची डागडुजी करून तिचे नूतनीकरण आवश्यक आहे, अशी मागणी केली. (राष्ट्रपुरुषांशी निगडित वास्तूंची अशी हेळसांड करणारे राज्यकर्ते जनतेमध्ये राष्ट्रप्रेम काय निर्माण करणार ? – संपादक)