मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर धारिकेमधील माहितीत पालट करून चौकशीचा आदेश रहित करण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चौकशी आदेशाच्या धारिका गुप्त असतात. असे असतांनाही हा प्रकार घडणे धक्कादायक आहे. या प्रकरणाची खोलवर चौकशी होऊन दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !
मुंबई – युतीचे सरकार असतांना ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मधील बांधकामात अनियमितता झाल्याच्या कारणावरून सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनेक अभियंत्यांची चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. यामध्ये अधीक्षक अभियंता नाना पवार यांचेही नाव होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संबंधित एका महत्त्वाच्या धारिकेत असणार्या माहितीच्या कागदपत्रावर स्वाक्षरी केली होती; मात्र या माहितीत परस्पर पालट करून मुख्यमंत्र्यांनी दिलेला चौकशीचा आदेश परस्पर रहित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दैनिक ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भात वृत्त दिले आहे.
धारिकेत मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर स्वाक्षरीच्या वरील भागामध्ये लाल शाईने दुसरी माहिती लिहिण्यात आली आहे. त्यामध्ये ‘नाना पवार या अभियंत्याची चौकशी बंद करावी’, असेही लिहिण्यात आले होते. प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामध्ये मुख्यमंत्र्यांची अनुमती अंतिम असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी ही महत्त्वाची असते; मात्र मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर थेट माहिती पालटण्याचे धाडस कुणी केले ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सौजन्य : एबीपी माझा