संस्कृतला महत्त्व दिले जात नसल्याने मी संस्कृत भाषेत चित्रपटनिर्मिती केली ! – दिग्दर्शक वीजेश मणी

नमो चित्रपटाचे पोस्टर

पणजी – संस्कृत ही समृद्ध भाषा असूनही तिला महत्त्व दिले जात नाही; म्हणून मला संस्कृत भाषेतील चित्रपटाची निर्मिती करायची होती, असे उद्गार नमो या श्रीकृष्ण आणि सुदामा या कथेवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. वीजेश मणी यांनी काढले. येथे २३ जानेवारी या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नमो हा १०२ मिनिटांचा संस्कृत चित्रपट संस्कृतला प्रोत्साहन देणारा असून प्रेक्षकांना श्रीकृष्ण आणि कुलेचा (सुदामा) यांची कथा सांगतो.

या चित्रपटातून कोणता संदेश दिला जातो, याविषयी सांगतांना मणी म्हणतात, राज्यकर्ता आणि नागरिक कसा असावा, हे नमो हा चित्रपट सांगतो. चित्रपटाचे कथानक वर्तमानकाळापासून चालू होऊन श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यातील संबंधांकडे घेऊन जाते. श्रीकृष्ण आणि सुदामा या कथेद्वारे भगवंत व्यक्तींमध्ये आर्थिक निकषांवरून भेदभाव करत नाही, तर तो खर्‍या भक्तीला महत्त्व देतो, हे दिसून येते. या चित्रपटात काम करण्यासाठी देशातील विविध भागांतील कलाकारांना एकत्र आणण्यात आले होते. पद्मश्रीप्राप्त भजन गायक अनुप जलोटा यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. वीजेश मणी हे एक सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहेत.