नॅशनल मायग्रंट सपोर्ट पोर्टलचा शुभारंभ
स्थलांतरित कामगारांच्या समस्या सुटणार
पणजी, २३ जानेवारी – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २२ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमात नॅशनल मायग्रंट सपोर्ट पोर्टलचा शुभारंभ केला. राज्यात येणार्या स्थलांतरित कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या योजनेचा लाभ होणार आहे. वेबिनारच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, स्थलांतरित कामगारांसाठी पोर्टलचा शुभारंभ करणे हा केंद्राने घेतलेला एक ऐतिहासिक निर्णय आहे. गोव्यात बांधकाम क्षेत्र, मासेमारी आणि हॉटेल उद्योग या महत्त्वाच्या ३ क्षेत्रांत स्थलांतरित कामगार काम करत आहेत. विविध राज्यांमधून लाखो कामगार गोव्यात येतात. शासनाकडे या कामगारांविषयी योग्य माहिती उपलब्ध नसल्याने त्यांना वेळप्रसंगी सहकार्य करणे शासनाला कठीण होते, तसेच कामगारांसाठी सुनियोजित योजना राबवणे शासनाला कठीण होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरित कामगारांना अपुरी माहिती, भीती, अपुरा समन्वय आदींमुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागले. पोर्टल चालू झाल्याने या समस्यांवर मात करता येणार आहे. राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे, राज्याच्या कामगारमंत्री जेनिफर मोन्सेरात आदींची या वेळी भाषणे झाली.