गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

परात्पर गुरु डॉ. आठवले

सौ. मंगला मराठे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी १९९१ या वर्षी साधनेला आरंभ केला. या साधनाप्रवासात त्यांना वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सान्निध्य आणि मार्गदर्शन यांचा लाभ झाला. परात्पर गुरुमाऊलीच्या समष्टी साधनेसाठी उपयुक्त अवतारी व्यक्तीत्वाचे सारे रेशीमधागे उलगडणारा हा साधनाप्रवास सौ. मंगला मराठे यांनी शब्दबद्ध केला आहे. आपण तो त्यांच्या शब्दांतच अनुभवण्याचा प्रयत्न करूया.

२३ जानेवारी या दिवशी सौ. मंगला मराठे यांच्या कुटुंबियांवर परात्पर गुरु डॉक्टरांनी कसा कृपेचा वर्षाव केला आणि त्यांना त्रासातून मुक्त केले, याविषयी लिखाण पाहिले, आज त्यापुढील भाग पाहूया.

भाग ११.

भाग १० वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/444291.html


सौ. मंगला मराठे

१५. सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी झालेल्या वास्तूसाठीही नामजपादी उपाय करून तिला चैतन्य प्रदान करण्याचे अलौकिक सामर्थ्य असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

१५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धामसे येथील वास्तूवर केलेले नामजपादी उपाय !

१५ अ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धामसे येथील वास्तूत प्रथम प्रवेश करतांनाच ही पूण्यभूमी आहे. इथे आश्रमजीवन शिकवता येईल, असे सांगणे आणि ते वास्तूत येऊन गेल्यानंतर वास्तूची स्पंदने मंदिराप्रमाणे जाणवणे :
वर्ष १९९२ च्या मार्च मासात परात्पर गुरु डॉ. आठवले प्रथमच धामसे येथे आले होते. मुख्य प्रवेशद्वारातून आत येतांनाच ते म्हणाले, ही पुण्यभूमी आहे. इथे आश्रमजीवन कसे जगायचे ?, याचे अभ्यासवर्ग घेऊया. प्रत्यक्षात वर्ष १९९८ मध्ये धामसे येथे सनातनचा आश्रम चालू झाला. पुढे अनेक साधक येथे साधना आणि प्रसारकार्य यांसाठी येऊन राहिले आणि त्यांनी आश्रमजीवनाचा लाभही घेतला. परात्पर गुरु डॉक्टर धामसे येथील आमच्या रहात्या घरात प्रथमच येऊन गेल्यानंतर घरी येणार्‍या बर्‍याच परिचितांनी आम्हाला मंदिरात आल्यासारखे वाटते, असे सांगितले.

१५ अ २. धामसे येथील वास्तूत सनातनच्या कार्याला सूक्ष्मातून विरोध होऊन वास्तूतील त्रास पुष्कळ वाढणे : धामसे येथील वास्तूत सामान्यपणे असतो, तसा २ टक्के त्रास होता. येथे सनातनचे कार्य चालू झाल्यावर सूक्ष्मातील त्रास वाढून हा त्रास ५ टक्क्यांपर्यंत वाढला. कलियुगात वास्तूचा त्रास अधिकाधिक १० टक्के असू शकतो. वास्तूत ७ टक्के त्रास असेल, तरी ती वास्तू रहाण्यायोग्य रहात नाही. ती वास्तू सोडावी लागते. वास्तूचा त्रास ५ टक्के असतांना तिच्यावर नामजपादी उपाय करून वास्तू शुद्ध करता येते, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला सांगितले.

१५ अ ३. वास्तूतील त्रास वाढल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी ५ वर्षे वास्तूसाठी नामजपादी उपाय करणे, त्यानंतर वास्तूतील त्रास न्यून होऊन वास्तूत चैतन्य आणि थंडावा जाणवणे : त्यानंतर कृपाळू परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या वास्तूसाठीही उपाय करण्याचे निश्‍चित केले. ते म्हणाले, हा त्रास आपल्यामुळे वाढला आहे; म्हणून आपणच उपाय करूया. आता त्या वास्तूत काहीच त्रास जाणवत नाही. उलट चैतन्य जाणवते. याविषयी काहीच ठाऊक नसलेल्या समाजातील सामान्य व्यक्तीलाही त्या वास्तूत चैतन्य, शांती आणि थंडावा जाणवतो. परात्पर गुरु डॉक्टर ईश्‍वरस्वरूप आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सजीव-निर्जीव वस्तूंचाही ते उद्धार करतात. सनातनच्या दैवी कार्यात सहभागी झालेल्या आश्रमाच्या वास्तूसाठीही त्यांनी ५ वर्षे उपाय केले.

१५ अ ४. परात्पर गुरु डॉक्टरांमधील चैतन्याने धामसे आश्रमातील सात्त्विकता आणि चैतन्य पुष्कळ वाढणे : धामसे येथे आलेले शिबिरार्थी आणि आश्रमात सेवा करणारे काही साधक यांना त्रास होत होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर वास्तू आणि साधक यांच्यासाठी नामजपादी उपाय करत होते. त्यामुळे हळूहळू वास्तूतील त्रास न्यून होऊन चैतन्य वाढत गेले. नंतर त्या वास्तूत साधकांचे ध्यान लागू लागले. परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेल्या उपायांमुळे वास्तूत बद्रीनाथ-केदारनाथ येथील मंदिरांएवढी सात्त्विकता निर्माण झाली आहे, असे आम्हाला जाणवले. बद्रीनाथ-केदारनाथ येथील सात्त्विकता सहस्रो वर्षांपासून आहे. आता येथे निर्माण झालेली ही सात्त्विकता आपल्याला टिकवायची आहे, असे ते आम्हाला म्हणाले.

१५ आ. धामसे येथे शिबिर असतांना विहिरीचे पाणी आटणे, तेव्हा परात्पर डॉक्टरांनी जलदेवतेची स्थापना करण्यास सांगणे आणि दुसर्‍या दिवशी विहिरीला १२ फूट पाणी येणे अन् धामसे येथे आल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करणे : धामसे येथे साधना आणि कार्य यांच्या अनुषंगाने विविध शिबिरे होत होती. त्यात १०० ते १५० इतके साधक सहभागी होत होते. वर्ष २००२ मध्ये असेच एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. तेव्हा धामसे येथील विहिरीचे पाणी आटले. त्या वेळी १०० साधकांची सोय करणे पुष्कळ कठीण झाले होते. परात्पर गुरु डॉक्टरांना ही गोष्ट सांगितल्यावर त्यांनी विहिरीच्या ठिकाणी जलदेवतेची स्थापना करण्यास सांगितली आणि दुसर्‍या दिवशी विहिरीला १२ फूट पाणी आले. त्यानंतर आजपर्यंत त्या विहिरीचे पाणी कधीच आटले नाही. त्या पाण्याला विशेष गोडी आहे आणि त्या पाण्याच्या सेवनाने चैतन्य मिळते, अशी पुष्कळ साधकांना अनुभूतीही आली आहे. या प्रसंगानंतर परात्पर गुरु डॉक्टर धामसे येथे आल्यावर त्या विहिरीजवळ जाऊन जलदेवतेला न विसरता वंदन करत.

१५ इ. परात्पर गुरु डॉक्टरांनी धामसे येथील आमराईतील आंब्याच्या झाडांवर केलेले चैतन्यदायी उपाय !

१५ इ १. धामसे येथील आमराईतील आंबे न येणार्‍या अंदाजे ५० झाडांना परात्पर गुरु डॉक्टरांनी कुरवाळणे, त्यानंतर त्या झाडांना पुष्कळ आंबे येऊ लागणे, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी कितीही आंबे आले, तरी ते साधकांनाच खायला द्यायचे, असे सांगणे : वर्ष १९९९ पासून १२ वर्षांत परात्पर गुरु डॉक्टर १३ वेळा धामसे येथे आले होते. त्यांनी तेथील आमराईत आंबे न लागणार्‍या अंदाजे ५० ते ५५ झाडांना प्रत्यक्ष जवळ जाऊन कुरवाळले होते. त्यानंतर त्या झाडांना पुष्कळ आंबे लागू लागले. या झाडांना कितीही आंबे लागले, तरी ते सर्व आंबे साधकांनाच खाण्यासाठी द्यायचे, असे त्यांनी आम्हाला सांगितलेे.

​त्यानंतर सूक्ष्मातील जाणणार्‍या साधकांनी ते शापित जीव होते आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना मुक्त केले, असे आम्हाला सांगितले.

१५ ई. परात्पर गुरु डॉक्टरांमुळे धामसे येथील मुक्या प्राण्यांच्या वागण्यात जाणवलेले पालट !

१५ ई १. परात्पर गुरु डॉक्टरांनी मुक्या प्राण्यांवरही उपाय करणे : धामसे आश्रमात ४ ते ५ कुत्री, गाय, घोडा असेही प्राणी होते. साधकांना होणार्‍या त्रासांसाठी परात्पर गुरु डॉक्टर नामजपादी उपाय सांगायचे, त्याचप्रमाणे ते या प्राण्यांना होणार्‍या त्रासावरही उपाय सांगायचे.

१५ ई २. धामसे येथे असणारा रामू नावाचा घोडा नाठाळ असणे, त्याने परात्पर गुरु डॉक्टरांना व्यवस्थित फिरवून आणणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टर धामसे येथे आले असतांना रामू नावाच्या घोड्यावर बसले. हा घोडा जरा नाठाळ होता. त्याच्या पाठीवर बसण्याचे कौशल्य केवळ एकाच साधकामध्ये होते. इतरांना तो पाडून टाकायचा; परंतु परात्पर गुरु डॉक्टर त्याच्या पाठीवर बसल्यावर त्याने त्यांना शांतपणे फिरवून आणले. तेव्हा त्या मुक्या आणि नाठाळ प्राण्यालाही हे आपला उद्धार करणारे आहेत याची जाणीव झाली, असे मला वाटले.

(ही धारिका वाचतांना मला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रातील पुढील गोष्ट आठवली, एका माणसाकडे एक घोडा होता. तो पुष्कळ अवखळ होता. त्यामुळे त्याच्या पाठीवर कुणीच बसत नसे. त्या माणसाने तो घोडा महाराजांना अर्पण केला. महाराजांनी त्या घोड्याच्या पाठीवरून हात फिरवला. तेव्हापासून तो घोडा शांत झाला आणि महाराजांचे सर्व ऐकू लागला. – कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.७.२०२०))

१५ उ. एकदा धामसे येथे एका संतांमध्ये दैवी संचार झाल्यावर ते आश्रमातील अश्‍वत्थ वृक्षाकडे जोराने पळणे, त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांना धावणे शक्य नसतांनाही त्यांनी सर्वांसमवेत धावणे : एकदा धामसे येथे एका संतांमध्ये दैवी शक्तीचा आविष्कार झाला आणि ते परिसरातील अश्‍वत्थ वृक्षाच्या दिशेने सुसाट पळत सुटले. त्यांच्या मागून त्यांचे सेवेकरी आणि अन्य साधक पळत होते. मला दम्याचा त्रास असल्याने मी सर्वांत शेवटी गेले. माझ्यासमवेत परात्पर गुरु डॉक्टरही हळूहळू पळत होते. वास्तविक त्यांना चालतांनाही त्रास होत होता, तरीही त्या स्थितीत ते स्वतःची काळजी न करता सर्वांसमवेत पळत होते. धाप लागली, तर ते किंचित थांबून पुन्हा धावत होते. शेवटी ते न थांबता त्यांच्यापर्यंत धावत गेले.

​किती हे त्यांचे अपार प्रेम !

​(क्रमश: उद्याच्या अंकात)

– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०१७)


भाग १२. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/444890.html

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक