येत्या ३० जानेवारीला बेमुदत उपोषण चालू करण्याची अण्णा हजारे यांची घोषणा
नगर – केंद्र सरकार दिलेल्या लेखी आश्वासनांच्या कार्यवाहीची घोषणा करत नाही, त्याविना आंदोलन थांबणार नसल्याच्या पवित्र्यात अण्णा हजारे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारवर नाराज असलेल्या अण्णांनी २२ जानेवारी या दिवशी भेटीला आलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासाठी, ‘मला त्यांना भेटायचे नसून तसा त्यांना निरोप द्या’, असे स्वत:च्या कार्यालयातील सहकार्यांना सांगितले होते; मात्र तरीही तिघेही राळेगणसिद्धीमध्ये आल्यावर अण्णांनी त्यांना भेट दिली. या वेळीही त्यांनी ‘कशाला आलात, मी येऊ नका, म्हणून निरोप दिला होता’, असे सांगितले. तसेच त्यांनी येत्या ३० जानेवारीला मो. गांधींच्या पुण्यतिथीपासून बेमुदत उपोषण चालू करण्याचे घोषित केले आहे.
तसेच रामलीला मैदान व्यवस्थापनाने जागेच्या अनुमतीविषयी उत्तर न दिल्याने या सर्व गोष्टींना अण्णांनी केंद्र सरकारला उत्तरदायी धरत अखेर राळेगणसिद्धीमध्येच आंदोलन करण्याचा निर्णय अंतिम केला आहे. तसेच या प्रश्नाची कोंडी ही भाजपच्या राज्य स्तरावर नव्हे, तर केंद्र सरकार स्तरावरच सुटेल, असे संकेत अण्णांनी एकप्रकारे दिले आहेत.